हिंदुसम्राट न्यूज
तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; उरणमध्ये खळबळ.
उरण, दि. 22/10/2026
पत्रकार / पूजा चव्हाण.
कामावरून घरी जात असलेल्या एका तरुणाला अडवून मारहाण करत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उरण तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नमेश कृष्णा पाटील (वय ३१ वर्षे) हा तरुण गुरुवारी दि. २२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कामावरून आपल्या दुचाकीवरून सारडे येथील आपल्या घरी जात होता. त्यावेळी मोठे भोम येथील पी. पी. खारपाटील पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात व्यक्तीने त्याला रस्त्यात अडवले.
अडवल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने नमेश पाटील याला बेदम मारहाण केली आणि त्याच्या अंगावर ज्वलनशील पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात नमेश गंभीर जखमी झाला.
दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी धाव घेऊन नमेशला वाचवले आणि तातडीने त्याला मोठे भोम येथील एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेचा फायदा घेत हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनेची दखल घेतली. जखमी तरुणाला अधिक उपचारासाठी पोलीस व नागरिकांच्या मदतीने नवी मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



