उरण भेंडखळ मध्ये बेकायदेशीर जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट, पोलिसांचे दुर्लक्ष?
उरण, भेंडखळ | पत्रकार पूजा चव्हाण
उरण तालुक्यातील भेंडखळ गावात काही ठिकाणी बेकायदेशीररित्या घरांमध्ये जुगाराचे अड्डे चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रात्री भर उशिरापर्यंत हे अड्डे सुरू असल्याने परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही घरांमध्ये बाहेरून लोकांना बोलावून पत्त्याचा जुगार, मटका सारखे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे परिसरात भांडणे, वाद आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या काळात या प्रकारात वाढ झाल्याचेही नागरिक सांगत आहेत.
या बेकायदेशीर धंद्यांमुळे गावातील शांतता धोक्यात आली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भेंडखळ येथील नागरिक आणि महिला वर्गातून होत आहे.


