उरणमध्ये ACB ची मोठी कारवाई; सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठीसह कोतवाल रंगेहाथ पकडले.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 6/9/2026

उरणमध्ये ACB ची मोठी कारवाई; सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठीसह कोतवाल रंगेहाथ पकडले.


पत्रकार /पूजा चव्हाण 

उरण, दि. 6 - उरण तालुक्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मोठी कारवाई करत कोप्रोली मंडळ अधिकारी के.डी. मोहिते, सजा चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी आणि कोतवाल नथुराम कातकरी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याला सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करायची होती. त्यासाठी कोप्रोली मंडळ अधिकारी आणि चिरनेर तलाठ्याने संगनमत करून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत ACB चे उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रथम पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर आज मंगळवारी सजा चिरनेर तलाठी कार्यालयात अत्यंत गुप्तपणे सापळा रचण्यात आला. कोतवालामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताच ACB च्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासासाठी उरण पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.


दरम्यान कारवाईच्या वेळी तलाठी जयहिंद कोळी यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगून घटनास्थळावरून पळ काढल्याची चर्चा आहे. तसेच मंडळ अधिकारी के.डी. मोहिते यांनी सन 2023-24 मध्ये सजा चिरनेर येथे काम पाहत असताना पगार पनवेल तालुक्यातील सजा पारगाव कार्यालयातून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महसूल विभागाच्या या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आला असून भाजप सरकारची प्रतिमा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मलीन होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नवी मुंबई ACB ची ही उरण तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top