"जासई तलावात अंघोळीचा बेत ठरला काळ; 3 अल्पवयीन मुलींचा बुडून करुण अंत, उरण तालुक्यात हळहळ "

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 6/6/2026

"जासई तलावात अंघोळीचा बेत ठरला काळ; 3 अल्पवयीन मुलींचा बुडून करुण अंत, उरण तालुक्यात हळहळ "






पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, 6 जून 2026 - उरण तालुक्यातील जासई गावात आज दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच सुन्न केले आहे. तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याची खोली लक्षात न आल्याने बुडून मृत्यू झाला. एकाचवेळी तीन निष्पाप जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दि. 6 जून 2026 रोजी दुपारी 14:30 ते 15:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेहानाखातून रमजाआली (वय 8 वर्षे), रवीना परवीन रमजाआली (वय 7 वर्षे) आणि सौम्या कन्हैया कुमार (वय 12 वर्षे) या तिघी जासई गावातील तलावात अंघोळीसाठी उतरल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्या.


आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. तिघींनाही पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मयत तिन्ही मुली जासई गाव, उरण येथील इस्माईल यांच्या चाळीत राहत होत्या. त्या मूळ उत्तर प्रदेशच्या रहिवासी होत्या. 

या घटनेची नोंद उरण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे पाठविण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर तलाव, बंधारे व नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली असते. अशा वेळी लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीशिवाय पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जासई गावासह संपूर्ण उरण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top