"उरणमध्ये लाईटचा 'लपंडाव': रात्रभर अंधार, BP-दम्याचे पेशंट हैराण; महावितरण म्हणतंय 'आम्ही सायलेंट मोडवर' "

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 6/6/2026

"उरणमध्ये लाईटचा 'लपंडाव': रात्रभर अंधार, BP-दम्याचे पेशंट हैराण; महावितरण म्हणतंय 'आम्ही सायलेंट मोडवर' "


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, 5 जून 2026 : उरण परिसरातील काही भागात सध्या 'लाईट गेली' नावाचा सण रोजच साजरा होत असून काल रात्री तर कहरच झाला. पाऊस नव्हता, वादळ नव्हतं, तरी अख्खी रात्र लाईट मॅडम गायब झाल्या. BP, दमा आणि हार्टचे पेशंट रात्रभर 'आता काय करायचं' या विचारात जागे होते. नागरिक सांगतात की, आमच्याकडे पाऊस पडला नाही तरी महावितरणच्या ऑफिसमध्ये 'सुट्टीचा पाऊस' पडतो. रात्रभर लाईट नसते आणि इमर्जन्सी वाले साहेब मोबाईल बंद करून झोपलेले असतात. म्हणजे लाईट गेली की त्यांचा मोबाईल पण 'लोडशेडिंग'वर जातो. BP चे पेशंट, दम्याचे पेशंट रात्रभर जागे असताना त्यांना फरक पडत नाही. त्यांचं म्हणणं आहे - 'तुम्ही पेशंट आहात, आम्ही पेशन्स ठेवतो'.


महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे की, रात्री 10 नंतर त्यांचा मोबाईल 'डू नॉट डिस्टर्ब' मोडवर असतो कारण ते 'वर्क-लाईफ बॅलन्स' पाळतात. लाईट गेल्यावर जनता फोन करते, पण त्यांची 'लाईफ' तेव्हा सुरू होते. ऑफिसमध्ये कोण थांबणार, कारण लाईटच नाही तर पंखा कसा चालणार. बिल भरलं नाही की ते लगेच मीटर कट करतात कारण 'ते कर्तव्य आहे', पण लाईट देणं 'ऑप्शनल' आहे. 


नागरिकांचा सर्वात मोठा आक्षेप हा आहे की, पावसाळ्यापूर्वी महावितरणचे कर्मचारी झाडांच्या फांद्या छाटणे, वायर दुरुस्त करणे अशी कोणतीही देखभाल-दुरुस्तीची कामे करत नाहीत. आणि मग पाऊस पडला की लगेच कारण तयार - 'झाडं वाढली आहेत, त्यामुळे लाईट गेली'. फोन केला तर उचलतच नाहीत. आणि चुकून उचलला तर नागरिकांना उत्तर मिळतं - 'गाडीवर होतो, काम करत होतो'. अरे, गाडीवर असताना कोणतं काम? लाईट जोडण्याचं की फोन कट करण्याचं? या 'कामगिरी'बद्दल आता संतप्त नागरिक व्यंगाने म्हणतात, "अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना 'उरण रत्न' पुरस्कार देऊन त्यांचा जाहीर गौरवच करायला हवा. कारण लाईट घालवण्यात यांचा हातखंडा आहे!"


एका घरात दम्याचा पेशंट असल्याने रात्रभर नेब्युलायझर बंद होता. इन्व्हर्टर पण ओरडून बंद पडला. सांगतात की टोल फ्री ला फोन केला तर 'सर्व प्रतिनिधी व्यस्त आहेत' सांगण्यात आले. लाईट गेली की प्रतिनिधी पण गायब होतात का, असा सवाल नागरिकांनी केला. बिलाचे रेट तर असे आहेत जणू लोक अंबानीच्या बंगल्यात राहतात. लाईट महिन्यातून 15 दिवस असते, पण बिल मात्र 30 दिवसांचं येतं. 


या परिस्थितीवर नगराध्यक्षांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी महावितरणला इशारा दिला की, तुम्ही मोबाईल बंद ठेवता, आम्ही तुमचं मीटर बंद करू. तुम्ही रात्रभर गायब होता, आम्ही तुमची झोप उडवू. उरणच्या जनतेला लाईट द्या, नाहीतर तुमच्या ऑफिसची लाईट कायमची घालवू. RDSS योजनेची अंडरग्राउंड केबल टाका, नाहीतर परिणाम भोगा.


सध्या परिस्थिती अशी आहे की, उरणच्या काही भागात 'लाईट आली' की लोक देवाला नारळ फोडतात आणि 'लाईट गेली' की महावितरणला दोष देतात. महावितरणचे कर्मचारी म्हणतात, "बिल भरा, लाईट आमच्या मर्जीवर." जनता म्हणते, "आधी लाईट द्या, मग बिलाची बात करू." या 'तू लाईट दे, मी बिल देतो' या जुगलबंदीत सध्या तरी BP चे पेशंटच जिंकत आहेत कारण त्यांचा BP रोज नवीन हाय स्कोअर करतोय. महावितरणने आता तरी जागे व्हावे, नाहीतर जनतेचा 'फ्यूज' उडाला तर अवघड होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top