उरण बायपास लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवरून वाद; नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 24/10/2026

उरण बायपास लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवरून वाद; नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.

प्रोटोकॉलचा भंग की राजकीय डाव? महिला नगराध्यक्षा म्हणून जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप.


उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण. 

उरण  दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या उरण नगरपरिषदेला जोडणाऱ्या बायपास रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.



उरणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर टाकण्यात आलेले नाही. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र लिहून वस्तुस्थिती दर्शक कारण मागितले आहे.



पत्रात नगराध्यक्षा घाणेकर यांनी म्हटले आहे की,

१) मी उरण नगरपरिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्षा असून उरण शहराची प्रथम नागरिक आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार अशा शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेवर माझे नाव असणे बंधनकारक आहे.

२) असे असतानाही माझे नाव जाणीवपूर्वक टाकले गेले नाही. मी महिला नगराध्यक्षा आहे म्हणून की, सरकार ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाची मी नाही म्हणून माझे नाव टाकले नाही का? असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

३) हे केवळ माझा वैयक्तिक अपमान नसून, मला निवडून देणाऱ्या समस्त उरणच्या जनतेचा अपमान आहे. लोकशाहीत लोकनियुक्त प्रतिनिधीचा असा अवमान योग्य नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या प्रकरणाची लेखी कारणे तात्काळ कळवावीत, अन्यथा समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशाराही नगराध्यक्षा घाणेकर यांनी या पत्रातून दिला आहे.

या पत्राच्या प्रती माहितीसाठी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त कोकण विभाग आणि आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय यांना पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहराच्या प्रथम नागरिकाला डावलून कार्यक्रम घेणे हा प्रोटोकॉलचा भंग असून महिला लोकप्रतिनिधीचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी चर्चा उरणमध्ये सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top