हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 5/9/2026
पहाटे अवजड वाहतुकीदरम्यान थोडक्यात अनर्थ टळला; करंज्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
पत्रकार / पूजा चव्हाण.
करंजा - मुळेखंड फाटा ते करंजा द्रोणागिरी हायस्कूल खालील रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास मोठा अनर्थ थोडक्यात टळल्याची घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे मोठ्या क्रेनचे अवजड साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनातून एक लोखंडी भाग रस्त्यावर पडला. त्याचवेळी तेथून एक प्रवासी जात होता, जो सुदैवाने बचावला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर साहित्य परिसरात कार्यरत असलेल्या अफकॉन कंपनीच्या कामाशी संबंधित असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सदर अवजड वाहतुकीसाठी आवश्यक पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का आणि वाहतुकीदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन करण्यात आले होते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. घटनास्थळाच्या वरून वीजवाहिनी गेली असल्याने अधिक दक्षता घेणे आवश्यक होते, असेही नागरिकांचे मत आहे.
या घटनेची संबंधित प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



