हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 8/9/2026
बँकेत खोट्या नोटा भरण्याचा डाव फसला; उरणमध्ये एकावर गुन्हा.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण / कॅनरा बँकेच्या धुतूम शाखेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा भरण्याचा प्रयत्न फसला असून याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक ०३/०९/२०२६ रोजी दुपारी ०२:३० ते ०३:३० वाजेच्या दरम्यान कॅनरा बँक, धुतूम, ता. उरण येथे घडली आहे. याबाबत बँकेच्या अधिकारी सौ. सपना रघुनाथ बोरशे, वय ४९ यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी अनिकेत दशरथ ठाकूर, वय ३३, रा. बोरखार, ता. उरण याने ५०० रुपयांच्या ५० नोटा म्हणजेच २५,००० रुपये भरण्यासाठी बँकेत आणल्या होत्या. बँकेचे कॅशियर यांनी सदर नोटा काउंटिंग मशीनमध्ये तपासल्या असता त्या सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेकडून तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले.
या प्रकरणी उरण पोलीस ठाणे गु.र.नं. ३९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश कु-हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश कु-हाडे करत आहेत.
दरम्यान, याबाबत उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सध्या गणेशोत्सवासारखे सण जवळ आले असून बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. गर्दीच्या वेळी नागरिक पैसे नीट न बघताच घेतात, याच फायदा घेऊन खोट्या नोटा बाजारात आणल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी कोणताही व्यवहार करताना नोटा व्यवस्थित तपासून घ्याव्यात आणि संशयास्पद नोट आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.


