हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 17/9/2026
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खड्ड्यात गाडला.
पत्रकार / पूजा चव्हाण.
गव्हाण फाटा | गव्हाण फाटा ब्रिजखाली रेल्वे रुळालगत राहणाऱ्या एका महिलेचा तिच्याच पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खड्डा खणून गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मयत महिलेचे नाव बिबीयाना सुशील हीरेन (वय 35) असे आहे. तर आरोपी पती सुशील सिमोन हीरेन (वय 35) आणि त्याचा मित्र रमेश थमस एक्का (वय 32) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही भंगार विकून उदरनिर्वाह करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी हे तिघेही भंगार विकण्यासाठी गेले होते. भंगार विकून आल्यानंतर सुशील हा तिथेच दारू पिऊन थांबला, तर रमेश आणि बिबीयाना हे दोघे घरी परत आले. सुशीलला आपल्या पत्नीचे रमेशसोबत काहीतरी लफडे असल्याचा संशय होता. तो घरी परत आल्यानंतर त्याने बिबीयानाशी भांडण करून तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीतच ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी तिथेच न थांबता तिचा मृतदेह जवळच खड्डा खणून रमेशच्या मदतीने गाडण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे मयत महिलेला पाच वर्षांचा लहान मुलगा देखील आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार जितीन प्रकाश खरात यांनी दिलेल्या खबरीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 690/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले असता दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 01.10 वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ 3 च्या पोलीस उपआयुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.
या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत मेटे करत आहेत.


