खिडकीतून घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; उरण पोलिसांची दमदार कामगिरी.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

खिडकीतून घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; उरण पोलिसांची दमदार कामगिरी.


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, दि. 4 सप्टेंबर - घराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला उरण पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद करत गुन्हा उघडकीस आणला आहे. उरण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघड झाला आहे.



पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, अप्पर आयुक्त प्रमोद शेवाळे आणि उपायुक्त अमित काळे यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 च्या दरम्यान आवरे, ता. उरण येथील एका घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने 9 लाख 77 हजार 300 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 256/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसून तो पत्नीसोबत राहत नसल्याची माहिती मिळाली. अधिक तपासात तो सोलापूर, अक्कलकोट, चाकण, आदमापूर, कोल्हापूर परिसरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये राहत असल्याचे समोर आले. तब्बल 26 दिवस त्याचा मागोवा घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी अनिल लक्ष्मण नाईक, वय 48, धंदा रिक्षा चालक, रा. गिरवले, ता. पनवेल याला कोल्हापूरहून पनवेलकडे प्रवास करत असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोलनाक्यावर सापळा रचून दि. 31 ऑगस्ट रोजी अटक केली.


चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 9 लाख 77 हजार रुपयांपैकी 9 लाख 64 हजार 300 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीवर यापूर्वी नवी मुंबई आणि रायगड परिसरात घरफोडी, जबरी चोरीचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.


ही उल्लेखनीय कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जगदिश शेलकर, पो.नि. राहुल काटवानी, पोउपनि गोविंद केंद्रे, पोहवा जयंत घरत, किशोर फंड, पोना अनिल मानकर, पोशि रियाज शेख आणि बसवराज सकपाळ यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top