हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/9/2026
बातम्या छापून झाल्या, पत्र देऊन झाले, तरीही सुसाट आहेत डंपर - द्रोणागिरी हायस्कूलच्या गेटवर मृत्यूचा ट्रॅफिक जॅम!
पत्रकार / पूजा चव्हाण.
करंजा - उरण |
डायलॉग तर ऐकलाच असेल - "कायदा माझ्या खिशात आहे!" तशीच अवस्था सध्या करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल (इंग्रजी माध्यम) च्या गेटवर आहे. नियम माझ्या चाकाखाली आहे, असं म्हणत अफकॉन्स कंपनीचे अवजड डंपर शाळा सुटण्याच्या वेळेतही सुसाट धावत आहेत.
एवढ्या बातम्या लावून, शाळेने लेखी पत्र देऊन सुद्धा या बेधडक वाहतुकीला ब्रेक लागत नाहीये, याच अर्थ कंपनीला चिमुकल्यांच्या जीवापेक्षा त्यांच्या प्रोजेक्टची घाई जास्त महत्त्वाची वाटते का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
रयत शिक्षण संस्थेच्या करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल (इंग्रजी माध्यम) च्या परिसरात सध्या अफकॉन्स कंपनीच्या विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे अवजड ट्रक आणि डंपर याच रस्त्यावरून दिवसभर ये-जा करतात. पण प्रॉब्लेम असा आहे की, नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेतच या गाड्यांची गर्दी वाढते. शाळेच्या मुख्य गेटजवळ प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि पायी जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कधीही मोठा अपघात होईल की काय, अशी भीती पालक आणि शिक्षकांना सतावत आहे.
याच समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी अफकॉन्स कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकांना विशेष पत्र पाठवून सहकार्याचे आवाहन केले आहे.
*शाळेची मागणी काय आहे?*
शाळेने पत्रात अगदी हात जोडून विनंती केली आहे की,
*सोमवार ते शुक्रवार दुपारी 12:45 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत* आणि
*शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत*
किमान या 1 तासासाठी तरी डंपर व ट्रकची वाहतूक तात्पुरती रोखावी.
शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे की, या काही मिनिटांच्या कालावधीत जर अवजड वाहनांची वाहतूक रोखली किंवा नियंत्रित केली, तर शाळेच्या परिसरातील रस्ता मोकळा राहील आणि लहान मुले विनाअडथळा व सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकतील.
*पण प्रत्यक्षात काय होतंय?*
शाळेने पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, कंपनी व्यवस्थापनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व वाहनचालकांना, कंत्राटदारांना आणि वाहतूक ऑपरेटर्सना या ठराविक वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत.
पण वस्तुस्थिती अशी आहे की - *पत्र गेलं फाईलमध्ये आणि डंपर आले रस्त्यावर!*
पालकांचा टोला : "आम्ही मुलांना सांगतो - बेटा, गाडी बघून चाल. आणि कंपनी ड्रायव्हरला सांगते - बेटा, शाळा बघून पळव!"
शाळेच्या गेटवर एका बाजूला 10 वर्षाची चिमुकली आपली दप्तर सावरत आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 चाकी डंपर धुरळा उडवत सुसाट जात आहे. हा खेळ जीवघेणा आहे.
प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आणखी किती पत्र द्यायची? आणखी किती बातम्या लावायच्या? उद्या एखादा अपघात झाल्यावरच कंपनी आणि प्रशासनाला जाग येणार का?
संबंधित प्रशासन आणि अफकॉन्स कंपनीने तातडीने या वेळेत वाहतूक बंद करून दाखवावी, अन्यथा होणाऱ्या कोणत्याही अपघाताची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच असेल, असा इशारा पालक वर्गातून दिला जात आहे.


