हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 30/8/2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा गैरव्यवहार? चौकशी अहवालानंतरही कारवाई रखडल्याचा आरोप.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, दि. 30 ऑगस्ट - नागाव ग्रामपंचायतीमधील आर्थिक गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थ स्वप्नील माळी, उमेश म्हात्रे, अमोल गावंड, सागर म्हात्रे, विठ्ठल म्हात्रे, विनोद ठाकूर, गणेश ठाकूर, गिरीश ठाकूर, विश्वास मढवी, नंदकिशोर म्हात्रे, महादेव म्हात्रे, अनंत म्हात्रे, मंगेश म्हात्रे, शांताराम म्हात्रे, मनोहर ठाकूर, अरुण कोळी आदी ग्रामस्थांनी दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद रायगडकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवर 9 फेब्रुवारी 2026 रोजी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या चौकशी अहवालात तत्कालीन सरपंच चेतन गायकवाड आणि ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्याकडून अनियमित रक्कम वसूल करण्याचे आणि शासनाच्या 4 जानेवारी 2017 व 18 डिसेंबर 2018 च्या परिपत्रकानुसार कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र केवळ रक्कम वसूल करून प्रकरण संपवू नये, तर जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सतील माळी, उमेश म्हात्रे, अमोल गावंड आणि इतर सदस्यांनी केली आहे.
तक्रारीत महानगर गॅस पाइपलाइनच्या नुकसानभरपाईचे 18 लाख 95 हजार रुपये इतरत्र खर्च केल्याचा, 19 लाख 49 हजार रुपयांचे सोलर पथदिवे कागदावर दाखवून प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचा, नालेसफाईवर 9 लाख 86 हजार ज्यात 2 लाख 84 हजार रोख खर्च दाखविल्याचा, साहित्य खरेदीवर 21 लाख 91 हजार आणि एकाच महिला बचत गटाच्या नावाने वारंवार बिले अदा केल्याचा, ग्रामनिधी आणि 15 व्या वित्त आयोगातील 44 लाख 18 हजार रुपयांच्या खर्चात अनियमितता असल्याचा, ONGC मुख्य रस्त्यालगत नाल्यावर स्लॅबसाठी CSR मधून 95 लाख मिळूनही ग्रामनिधीतून 36 लाख 39 हजार खर्च करून निविदा टाळण्यासाठी कामाचे 10 तुकडे केल्याचा, आंबिकावाडी नाल्यावरील 29 लाख 53 हजार रुपयांचे काम निकृष्ट असल्याचा, पाणीपुरवठा योजनेवर 56 लाख 35 हजार खर्चूनही पाणी मिळत नसल्याचा, ONGC कर तडजोडीत 2.50 कोटींची थकबाकी असताना केवळ 40% रक्कम घेऊन तडजोड केल्याने गावाचे नुकसान झाल्याचा आणि वकिलांना 2020 ते 2025 मध्ये 24 लाख 50 हजार रुपये फी दिल्याचा तसेच नियमबाह्य कर्मचारी भरतीवर 21 लाख 78 हजार खर्च केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी आणि उरण पंचायत समिती स्तरावर होत असलेल्या विलंबाबाबत जिल्हा परिषद आणि कोकण आयुक्तांनी वेळेत निर्देश द्यावेत, अशी मागणी तक्रारदार स्वप्नील माळी, उमेश म्हात्रे, अमोल गावंड, सागर म्हात्रे, विठ्ठल म्हात्रे, विनोद ठाकूर, गणेश ठाकूर, गिरीश ठाकूर, विश्वास मढवी, नंदकिशोर म्हात्रे, महादेव म्हात्रे, अनंत म्हात्रे, मंगेश म्हात्रे, शांताराम म्हात्रे, मनोहर ठाकूर, अरुण कोळी यांच्यासह संघर्ष समितीच्या ग्रामस्थांनी केली आहे.



