हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/8/2026
जुन्या पिढीतील ऋषितुल्य नेतृत्व हरपले- हर्षवर्धन पाटील.
निरा नरसिंहपूर: प्रतिनिधी बाळासाहेब सुतार
महाराष्ट्राच्या शिक्षण, सहकार, आरोग्य तसेच सामाजिक व राजकीय पटलावर दादांचे योगदान हे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील जुन्या पिढीतील एक ऋषितुल्य नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्रिपुराचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी कोल्हापूरचे महापौर, पन्हाळ्याचे आमदार म्हणून केलेले काम आजही तेथील जनतेच्या स्मरणात आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती विद्यार्थ्यांसाठी केलेले आदर्श कार्य प्रेरणादायी आहे. दादांनी लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध दिली.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे सन 2009 पासून अनेक वर्ष त्रिपुराचे राज्यपाल होते. तसेच त्यांनी देशातील महत्त्वाचे राज्य असलेल्या बिहारचे राज्यपाल म्हणूनही सन 2013 ते 2014 मध्ये प्रभावीपणे काम केले. त्याचबरोबर सन 2014 मध्ये दादांनी देशातील दुसरे एक महत्त्वाचे राज्य असलेल्या पश्चिम बंगाल राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता, यातून दादांचे महान व्यक्तिमत्व लक्षात येते. तसेच दादांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे महाराष्ट्र व देश कधीही विसरू शकणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
माझे काका कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचेशी दादांचे स्नेहाचे संबंध होते. कोल्हापूर जिल्ह्याचा मी 10 वर्षे पालकमंत्री असताना दादांशी भेटण्याचा व त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा योग मला अनेकदा आला, अशा अनेक आठवणीही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केल्या.


