हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 13/8/2026
नवी मुंबई वाहतूक पोलिसांची "शाळा दत्तक योजना" - फुंदे येथील तुकाराम हरि वाजेकर विद्यालयात वाहतूक नियमांवर जनजागृती
पत्रकार / पूजा चव्हाण
उरण न्हावा शेवा :- मा. पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या "शाळा दत्तक योजना 2026-27" (Adopt A School) अंतर्गत आज फुंदे येथील तुकाराम हरि वाजेकर विद्यालय, ता. उरण, जि. रायगड येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या योजनेचा मुख्य उद्देश लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त, रस्ता सुरक्षेचे संस्कार रुजवणे आणि त्यांना भविष्यातील जबाबदार वाहनचालक व रस्ता सुरक्षा दूत बनवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक वाहतूक शाखेच्या हद्दीतील प्रत्येक शाळा ही एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला दत्तक दिली जाते आणि तो अधिकारी दर महिन्याला त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.
त्याचाच एक भाग म्हणून आज न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्या वतीने फुंदे विद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी PC/4368 ताकभाते आणि PC/5248 दिवेकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना झेब्रा क्रॉसिंगचा वापर, वाहतूक सिग्नलचे पालन, हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, सायकल चालवताना सुरक्षितता, तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये याबाबत माहिती देण्यात आली. मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडू नये आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेतील 80 ते 100 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या उत्साहात सहभाग घेत वाहतूक पोलिसांना विविध प्रश्न विचारले.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असून, हेच विद्यार्थी आपल्या कुटुंबातही वाहतूक शिस्तीचा संदेश घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



