हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 22/7/2026
"शाळा दत्तक अभियान" अंतर्गत न्हावाशेवा वाहतूक शाखेचे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे, साई ट्रस्ट डोंबिवली JNPV शाळेत प्रबोधन.
पत्रकार / पूजा चव्हाण.
न्हावाशेवा, 21 जुलै 2026: देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी न्हावाशेवा वाहतूक शाखेने "शाळा दत्तक अभियान" अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या पथकाने आज जेएनपीटी येथील साई ट्रस्ट डोंबिवली JNPV शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण केली. या पथकात पोलीस हवालदार शशिकांत माळी हे देखील सहभागी होते.
नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच त्यांना रस्त्यावर सुरक्षित कसे वागावे याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी शाळेत जाऊन विविध प्रबोधनात्मक फलकांच्या मदतीने मुलांना रस्ता ओलांडण्याचे नियम, हेल्मेटचे महत्त्व, सीट बेल्टचा वापर, सिग्नलचे पालन आणि वाहतुकीच्या सूचनांचे पालन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रबोधन कार्यक्रमात शाळेतील अंदाजे 35 ते 40 विद्यार्थी आणि 2 शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आणि वाहतूक पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. मुलांना लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम अंगीकारावे जेणेकरून भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होईल असा उद्देश या अभियानामागे आहे.
न्हावाशेवा परिसर हा जेएनपीटी बंदरामुळे अवजड वाहनांची आणि कंटेनर वाहतुकीची वर्दळ असलेला भाग आहे. त्यामुळे येथील शाळांमधील मुलांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने वाहतूक शाखेने शाळा दत्तक घेऊन नियमितपणे अशा प्रकारचे प्रबोधन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षिकांनी वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात याचा निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की वरिष्ठ पोलीस निरीक्षक गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही हद्दीतील इतर शाळांमध्ये जाऊन अशाच प्रकारे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे.


