हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 23/7/2026
सेंट मेरीज जे ऐन पी स्कूल जेएनपीटी दैदीप्यमान यश! सांची कासुकार रायगड जिल्ह्यात प्रथम, उरण तालुक्यातील पहिल्या 5 मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची बाजी.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 22 जुलै 2026: शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या एसएससी परीक्षेत उरण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावलौकिक मिळवणाऱ्या सेंट मेरीज जे ऐन पी स्कूल जेएनपीटी येथे आज "इयत्ता 10 वी सत्कार समारंभ आणि संवाद मेळा" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती देताना सांगितले की, आपली विद्यार्थिनी कुमारी सांची संतोष कासुकार हिने 500 पैकी 498 गुण म्हणजेच 99.6% मिळवून उरण तालुक्यात प्रथम, रायगड जिल्ह्यात प्रथम आणि नवी मुंबई विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सांचीच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण शाळेचे नाव उंचावले आहे.
या यशात एकटी सांचीच नाही तर शाळेतील इतर चार विद्यार्थ्यांनीही उरण तालुक्यात आघाडी घेतली आहे. कुमारी तनिष्का नितीन ठाकूर हिने 491 गुणांसह 98.2% मिळवून उरण तालुक्यात दुसरा आणि रायगड जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला. मोक्ष विजय म्हात्रे 488 गुणांसह 97.6% मिळवून तालुक्यात तिसऱ्या, सृष्टी दत्ता सुळे 487 गुणांसह 97.4% मिळवून चौथ्या आणि आर्या अतिश पाटील 482 गुणांसह 96.4% मिळवून पाचव्या क्रमांकावर राहिली. अशा प्रकारे उरण तालुक्यातील पहिल्या पाच क्रमांकांवर सेंट मेरीजच्या विद्यार्थ्यांनीच वर्चस्व गाजवले.
कार्यक्रमात शाळेच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. रूपेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यश मिळवण्यासाठी केलेला अभ्यास, घेतलेले परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याविषयी माहिती दिली. वर्गशिक्षिका सौ. मगदूम आणि सौ. लिजी यांनीही विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
इयत्ता 10 वी च्या वर्गशिक्षिका सौ. रेशमा सेंडर आणि सौ. आरती मॅडम यांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे पर्यवेक्षक श्री. संदेश गावंड सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणातून शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगला शेट्टी मॅडम यांनी केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. संदेश गावंड सर, सौ. मंगला शेट्टी मॅडम, सौ. रेशमा मॅडम, सौ. आरती मॅडम, सौ. लिजी मॅडम, श्री. हरीश सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे सेंट मेरीज शाळेचा नावलौकिक अधिकच वाढला असून संपूर्ण उरण परिसरात अभिमानाची भावना आहे.


