हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 27/6/2026
उरण पोलिसांची धडक कारवाई कौतुकास्पद; दारूबंदी विभागाचे अधिकारी मात्र गाढ झोपेत? द्रोणागिरीत 36 हजारांचा अवैध दारू साठा जप्त, एकाला अटक.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 14 जुलै 2026: उरण परिसरात आणि द्रोणागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रकार वाढत असताना अखेर उरण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा दारू साठा जप्त केला आहे. मात्र इतकी मोठी कारवाई होऊनही घटना स्थळापासून अवघ्या 2 कि.मी. अंतरावर असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यालयीन परिसर या प्रकारांकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2026 रोजी रात्री 9.10 वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी, सेक्टर 59 येथील एका कंटेनरमध्ये "द्रोणागिरी ढाबा" या नावाने अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती उरण पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागातील पोलीस कर्मचारी किशोर तुकाराम पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उरण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाईचा बेत आखला.
पोलिसांनी 14 जुलै रोजी सदर ठिकाणी छापा टाकून कंटेनरमध्ये सुरू असलेला अवैध दारूचा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करत 36,559 रुपये किमतीचा दारू साठा आणि 790 रुपये रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी आकाश बॉबीलाल खनाल वय 27 वर्षे, राहणार सेक्टर 50, स्काय व्हिला बिल्डिंग, उरण, रायगड याला अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात मॅकडॉल नंबर 1, रॉयल चॅलेंज विस्की, इम्पीरियल ब्लू, रॉयल ग्रीन, मॅकडॉल रम, मॉन्स्टर डिलाईट, रुस्तम गोल्ड रम, किंगफिशर स्ट्राँग बियर, कॅसल बर्ग बियर, टर्बो स्ट्राँग बियर, कांगारू 9000 बियर, एलबी स्ट्राँग बियर, डी.जी.एम. आदी एकूण 17 प्रकारच्या 180 मिली ते 650 मिलीच्या शेकडो सिलबंद बाटल्यांचा समावेश आहे.
या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35 (3) अन्वये नोटीस बजावून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड हे करीत आहेत.
उरण पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु इतका मोठा अवैध दारूचा साठा उघडपणे विकला जात असताना दारूबंदी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. द्रोणागिरी परिसरातून अवघ्या 2 कि.मी. अंतरावर त्यांचे कार्यालय असूनही त्यांना याची खबरबात लागली नाही, हे विशेष.
त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अशा अवैध अड्ड्यांवर कायमस्वरूपी आळा बसवावा आणि तरुणाईला व्यसनाधीन होण्यापासून वाचवावे अशी मागणी केली आहे.


