धोकादायक शस्त्राने मारहाण प्रकरणी उरण न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपी बाळकृष्ण म्हात्रेला कारावास आणि दंडाची शिक्षा.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 14/7/2026

धोकादायक शस्त्राने मारहाण प्रकरणी उरण न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपी बाळकृष्ण म्हात्रेला कारावास आणि दंडाची शिक्षा.


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, 14 जुलै 2026: उरण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या धोकादायक शस्त्राचा वापर करून जाणूनबुजून इजा करण्याच्या गुन्ह्यात आरोपीला अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. उरणचे नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. जगदीश शेलकर* यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणेने हा खटला यशस्वीपणे लढवून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून दिली.

मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. पी. वानखेडे साहेब यांच्या उरण न्यायालय क्र. 1 मध्ये सुरू असलेल्या नियमित फौजदारी खटला क्र. 15/2022 चा निकाल शुक्रवारी 10 जुलै 2026 रोजी लागला.

उरण पोलीस ठाणे गु.र.न. 439/2020 नुसार आरोपी *बाळकृष्ण लाडग्या म्हात्रे* याच्यावर भा.द.वि. कलम 326, 324, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल होता. धोकादायक शस्त्राचा वापर करून फिर्यादीला गंभीर इजा केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

सविस्तर सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम 324 अंतर्गत साधा कारावास आणि 5,000 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच भा.द.वि. कलम 504 अंतर्गत 3 महिने साधा कारावास आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षाही सुनावली. दंड न भरल्यास यासाठी 15 दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.

या संपूर्ण खटल्यात अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील *श्री. प्रतिक भारत देशमाने*, सहा. सरकारी अभियोक्ता यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तपासादरम्यान पोउपनि *श्री. वायकर* आणि पोलीस अंमलदार *श्री. अविनाश खाडे* यांनी मोलाचे सहकार्य केले. आरोपीतर्फे अॅड. *श्री. रत्नदीप पाटील* यांनी बाजू मांडली.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. जगदीश शेलकर* यांनी या निकालानंतर सांगितले की, "कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना वाव देणार नाही. तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेत समन्वय साधून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे हेच आमचे प्राधान्य आहे."

या निकालामुळे उरण परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून कायद्याचा सन्मान राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top