हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 14/7/2026
मुंबई, दादर येथे सा. रायगड लोकधारा वृत्तपत्र संपादक तथा पत्रकार : विजय चंद्रकांत गायकर यांना निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित..
निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या पत्रकारितेची दखल; 'सा. रायगड लोकधारा वृत्तपत्रा ' च्या संपादकाचा मानाचा सन्मान...
मुंबईप्रतिनिधी : जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण वृत्तांकन करणारे 'सा. रायगड लोकधारा वृत्तपत्र ' संपादक तथा पत्रकार विजय चंद्रकांत गायकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल निर्भीड पत्रकार ' पुरस्काराने रविवारी (१२ जुलै) दादर, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित 'पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा–२०२६' या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात आयोजक, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या हस्ते विजय चंद्रकांत गायकर यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी श्रीधर कीर, विसुभाऊ बापट, अरुण म्हात्रे, पंढरीनाथ तामोरे, गुरुनाथ तिरपनकर, सुनील शिर्के, वैभव कदम, कृष्णा काजरोळकर, ॲड. गौरव पाटील आणि अतुल तोडकरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारितेत निर्भीड, निष्पक्ष आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने प्रभावी वृत्तांकन केल्याबद्दल विजय चंद्रकांत गायकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सा. रायगड लोकधारा वृत्तपत्र व डिजिटल माध्यमाच्या प्रभावी वापरातून सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी विश्वासार्ह पत्रकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
' रायगड लोकधारा ' या वृत्तपत्र व रायगड लोकधारा पोर्टल आणि युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने वृत्तांकन करत असून, त्यांच्या बातम्यांची दखल प्रशासनासह समाजातील विविध स्तरांवर घेतली जाते.
यापूर्वीही त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत विविध प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 'निर्भीड पत्रकार ' पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आणखी एक मानाचा सन्मान लाभला असून, पनवेल तालुक्यातील पोयंजे या गावाचा पत्रकारितेच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


