उरण बस डेपो रात्री 'दारू अड्डा' आणि 'अनोळखी गाड्यांचे पार्किंग'! महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 9/7/2026

उरण बस डेपो रात्री 'दारू अड्डा' आणि 'अनोळखी गाड्यांचे पार्किंग'! महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?



प्रतिनिधी पुजा चव्हाण हिजकडून )

उरण, 9जुलै 2026: प्रवाशांच्या सोयीसाठी असलेला उरण बस डेपो सध्या अनोळखी गाड्यांचे पार्किंग आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी डेपो परिसरात बाहेरील चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या गाड्या कोणाच्या आहेत आणि डेपोमध्ये त्यांना परवानगी कोणी दिली, याचे उत्तर मात्र एसटी प्रशासनाकडे नाही.



रात्रीच्या वेळी काही लोक दारूच्या बाटल्या घेऊन डेपोच्या कोपऱ्यात बसून मद्यपान करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अंधार, अपुरी लाईट आणि दारू पिणाऱ्यांची वर्दळ यामुळे डेपो परिसराचे वातावरण धोकादायक झाले आहे. 



सगळ्यात गंभीर बाब म्हणजे रात्रीच्या शेवटच्या बसने उतरणाऱ्या महिला आणि मुलींना या डेपोमधून एकट्याने घरी जावे लागते. आजूबाजूला अनोळखी लोक आणि गाड्या असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्या काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?


प्रवासी वाहतुकीचा डेपो हा फक्त एसटी बस आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतो. मग बाहेरील वाहनांना आत येण्याची मुभा कोणी दिली? सीसीटीव्ही आहेत का? रात्रीची सुरक्षा आहे का? या सगळ्या प्रश्नांवर प्रशासन गप्प आहे.


*नागरिकांचा संताप:* "पहाटे आणि रात्री कामावरून येणाऱ्या महिला याच डेपोचा वापर करतात. दारू पिणारे लोक आणि अनोळखी गाड्या पाहून भीती वाटते. एसटी अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घ्यावी" अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.


कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला नाव ठेवायचे नाही, पण डेपो प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक का केली आहे? उरणसारख्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. फक्त अपघात झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा, आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.


प्रशासनाने तातडीने डेपोमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, सीसीटीव्ही सुरू करावेत, बाहेरील गाड्यांना बंदी घालावी आणि रात्री गस्त वाढवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top