हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 5/7/2026
रेड अलर्टमध्ये समुद्र रौद्र, पिरवाडी बीच आणि धबधब्यावर जाऊ नका; हिंदुसम्राट न्यूजचा नागरिकांना आवाहन.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 5 जून 2026: रायगड जिल्ह्यात सध्या निसर्गाचा तडाखा सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी 4 ते 6 जुलैपर्यंत 'रेड अलर्ट' जाहीर केला असून या काळात अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेगही ताशी 50 ते 60 किमीपर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
या अलर्टमुळे उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा आणि परिसरातील धबधब्यांची अवस्था भयावह झाली आहे. समुद्र पूर्णपणे खवळला असून पाच मीटरपेक्षा जास्त उंचीच्या महाकाय लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. पिरवाडी किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठे मोठे दगडही निखळू लागले आहेत, त्यामुळे तिथे उभं राहणं म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे. पावसामुळे धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाहही तुफान झाला आहे. खडक अत्यंत निसरडे झाले आहेत आणि एक चूक झाली तरी थेट पाण्यात ओढले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही भरतीच्या वेळी पिरवाडी बीचवर पर्यटक अडकल्याच्या घटना घडल्यात, त्यामुळे धोका अजूनच वाढला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रायगड जिल्हा प्रशासनाने उरण, पनवेल आणि अलिबागसह अनेक ठिकाणच्या शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किनारपट्टीवर पोलिस आणि तटरक्षक दलाचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदुसम्राट न्यूज उरणकरांसह सर्व पर्यटकांना हात जोडून विनंती करत आहे. सेल्फी आणि रीलच्या हौसेसाठी सध्या पिरवाडी बीच, धबधबे किंवा समुद्र किनाऱ्यावर अजिबात जाऊ नका. निसर्गाशी पंगा घेण्याची ही वेळ नाही, कारण समुद्र माफी देत नाही. पाऊस थांबला आणि समुद्र शांत झाला की नक्की या, पण तोपर्यंत घरातच सुरक्षित रहा. जीवापेक्षा फोटो मोठा नाही, हे लक्षात ठेवा.


