विकासाच्या नावावर चिरनेर बुडतंय! गोदामांच्या भरावांमुळे गाव पाण्याखाली, शेतकरी म्हणतो 'आता भात पेरायचा की मासे सोडायचे?'

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 4/7/2026

विकासाच्या नावावर चिरनेर बुडतंय! गोदामांच्या भरावांमुळे गाव पाण्याखाली, शेतकरी म्हणतो 'आता भात पेरायचा की मासे सोडायचे?' 



चिरनेर, पूजा चव्हाण : 

शनिवार दि. ४ जुलै २०२६ च्या पहाटेपासून आकाशाने जणू हौदच उपडा केला आणि उरण तालुक्यातील चिरनेर या ऐतिहासिक गावाची पुन्हा एकदा पुराने दांडी घेतली. ढगफुटीसारखा पाऊस कोसळताच डोंगर-दऱ्यातून आलेलं पाणी थेट गावात घुसलं आणि नागरिकांच्या घराघरात संसाराची वाताहत झाली. भांडी, कपाटं, टीव्ही, फ्रीज सगळं पाण्यात तरंगायला लागलं. घरात पाणी शिरल्यावर एका आजी म्हणाल्या, "पोरा, यंदा पावसाळ्यात गच्चीवर राहायचंय का काय?" असा खोचक सवालही गावात फिरतोय. 



हवामान विभागाने आधीच २ ते ४ जुलै दरम्यान रायगडसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसाच पाऊस झाला आणि चिरनेरच्या रस्त्या-रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलं. गावासोबत आजूबाजूच्या शेताही जलमय झाल्या. शेतकऱ्याने नुकतंच टाकलेलं भाताचं बियाणं चार दिवस पाण्यात बुडून कुजलं. एक शेतकरी हात कुदळ घेऊन उभा राहून म्हणाला, "काका, यंदा भात नाही, आता थेट मासळीचा व्यवसाय करावा लागेल वाटतं!"



गावकऱ्यांचा आरोप आहे की याला जबाबदार आहेत चिरनेरच्या आजूबाजूला उभ्या राहिलेल्या हिंद टर्मिनल्स, मामाश्री गोदामांसह इतर मोठ्या गोदामांचे भराव. पूर्वी पावसाचं पाणी नैसर्गिक ओढे-नाल्यातून सरळ समुद्राला मिळायचं. पण विकासाच्या नावाखाली आलेल्या गोदामांसाठी मोठे मातीचे भराव टाकले आणि पाण्याचे रस्तेच बंद करून टाकले. भराव टाकताना पाण्यासाठी पाईप किंवा निचऱ्याची कोणतीच सोय केली नाही. त्यामुळे पाणी आता गावाकडे आणि शेतांकडे वळवले गेले आहे. २०२३ मध्येच असंच झालं होतं तेव्हा ३५० हून अधिक घरांमध्ये पाणी गेलं होतं. पण प्रशासनाने त्यातून काही बोध घेतला नाही आणि यंदा पुन्हा तेच चित्र दिसलं. 


केवळ चिरनेरच नाही तर कळंबुसरे, मोठीजुई, विंधणे, दिघोडे, वेश्वी, पाले या गावांच्या सखल भागातही पाणी शिरलं आहे. कातळपाडा, मधीलपाडा, रांजणपाडा, चिंचपाडा, मुळपाडा, कुंभारपाडा या वाड्यांतील लोकांचं घरात गुडघाभर पाणी आहे. कातळपाड्यातील नवी माथेरान वसाहत तर पूर्णपणे जलमय झाली आहे. लोक घरातून बोटीने बाहेर पडत असल्याचं चित्र आहे.


उरण परिसरात गेल्या काही वर्षांत गोदामे आणि कंटेनर यार्ड वेगाने वाढली आहेत. पर्यावरण तज्ज्ञही सांगतात की जलक्षेत्र बुजवल्याने उरणमध्ये अभूतपूर्व पूर येऊ लागले आहेत. गेल्या दोन दशकात कधीही पाणी न आलेल्या भागात आता दरवर्षी पूर येतो आणि सरकारला कोट्यवधींची भरपाई द्यावी लागते.


"विकास पाहिजे, पण आमची घरं बुडवून नको. आम्ही माणसं आहोत की गोदामांच्या मागे लपवले खेळणे आहोत?" असा सवाल चिरनेरच्या ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळा, सतर्क रहा अशा सूचना दिल्या आहेत. पण जोपर्यंत नैसर्गिक पाण्याचे मार्ग मोकळे होत नाहीत तोपर्यंत दर पावसाळ्यात चिरनेरला असाच जलप्रलय बघावा लागेल हे मात्र नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top