चांदणी चौकाचा "आंधळा" कॅमेरा! अपघात झाले की प्रशासन म्हणतं "आम्हाला काय माहित"

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 17/6/2026

चांदणी चौकाचा "आंधळा" कॅमेरा! अपघात झाले की प्रशासन म्हणतं "आम्हाला काय माहित"


उरण, 2026: सोनारी JNPT रोडवरचं चांदणी चौक म्हणजे गाड्यांचा गोंधळ आणि जीवाशी खेळ. कारण इथे लागलेला CCTV कॅमेरा गेली कित्येक महिने "ध्यान लावून" बसलाय. म्हणजे दिसतोय वर लावलेला, तारा लटकतायत, पण आतून तो काम करत नाहीये. 



आमच्या कॅमेऱ्यात दिसतंय तो कॅमेरा पोलवर लटकला आहे पण त्याच्या डोळ्यात जीव नाही. सिग्नल लाल-हिरवा होतोय पण कॅमेरा मात्र "मी बघत नाही" मोडवर आहे. मग इथे अपघात झाला की कसा झाला, कोणाची चूक होती हे शोधायला पोलीसही हात वर करतात. कारण पुरावा कुठून आणणार? कॅमेराच झोपला आहे.


स्थानिक लोक संतापून सांगतात "साहेब इथे महिन्यात 3-4 अपघात होतात. बाईकवाला पडतो, गाडी फुटते, माणसं दुखावतात. तक्रार करून करून आमचे घसे कोरडे झाले. पण प्रशासनाचं उत्तर एकच, अरे ती गरीब कंपनी आहे, पैसे नाहीत, समजून घ्या". म्हणजे माणसाचा जीव गेला तरी चालेल पण कंपनीच्या खिशाला झटका बसायला नको.


एका नागरिकाने तर थेट विचारलं "दादा कॅमेरा कधी सुरू होणार?" तर उत्तर आलं "प्रोसेस चालू आहे". प्रोसेस म्हणजे काय? फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरतेय आणि माणसं रस्त्यावरून सरळ दवाखान्यात फिरतायत. 


कॅमेरा बोलू शकला असता तर म्हणाला असता "मला लावा, पगार द्या, मी काम करेन". पण प्रशासन म्हणतं "अरे कॅमेरा आहे की, लोकांना धाक तरी बसतो". धाक कसला? अपघात करणारा पळून जातो आणि नंतर म्हणतो "पुरावा नाही". मग केस पण नाही.


चांदणी चौकात रात्री-अपरात्री मोठ्या गाड्या, कंटेनर धावतात. सिग्नल तोडणं, ओव्हरस्पीड सगळं चालतं. कारण त्यांना माहितीये वरचा कॅमेरा फक्त शोपीस आहे. इथे जर कुत्रा-मांजर रस्ता ओलांडला तरी त्याचा व्हिडिओ मिळेल, पण माणसाचा अपघात झाला की व्हिडिओ "टेक्निकल इश्यू" मुळे मिळत नाही.


प्रशासनाला एवढीच विनंती आहे की कॅमेरा लावायचा असेल तर चालू ठेवा. नाहीतर तो काढून घ्या. उगाच लावून लोकांच्या जखमेवर मीठ चोळू नका. कारण इथे जीव गेला की फक्त "दुर्दैवी घटना" म्हणून फाईल बंद होते. 


शेवटी नागरिक म्हणतात "आम्ही टॅक्स देतो, मत देतो, पण आमच्या सुरक्षेसाठी एक कॅमेरा दुरुस्त करायला पैसे नाहीत? मग हे पैसे जातात कुठे?" 


चांदणी चौक आता "चांदणी" राहिला नाही, तो "अंधारी चौक" झालाय. आणि जोपर्यंत हा कॅमेरा झोपेतून उठत नाही तोपर्यंत इथे अपघातांची मालिका अशीच सुरू राहणार 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top