हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 19/7/2026
उरणमध्ये डेब्रिजचा डोंगर! सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे माती-ढिगारा टाकणाऱ्या 24 डंपरविरुद्ध गुन्हा दाखल.
पत्रकार / पूजा चव्हाण
उरण, 19 जुलै 2026: उरण तालुक्यातील सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात बेकायदेशीरपणे डेब्रिज आणि मातीचा ढीग टाकणाऱ्या डंपर चालकांवर अखेर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली अनेक दिवस स्थानिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासन झोपेत असताना, आता कारवाईचा बडगा उगारला गेल्याने नागरिक प्रश्न विचारत आहेत - "तेव्हा डेब्रिज टाकला तेव्हा प्रशासन कोणत्या झोपेच्या आसनात होते?"
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 17/07/2026 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास डी.ए.एम.सी. सर्व्हिसच्या बाजूला, गव्हाण फाटा विसावे रोड येथे ता.म.वेली आणि विकासी येथील डंपर चालकांनी त्यांच्या ताब्यातील डंपरमध्ये डेब्रिज अनाधिकृतपणे आणून टाकला. यामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यास आणि जीवितास हानी होऊ शकते अशा बेजबाबदार आणि बेकायदेशीर पद्धतीने सिडकोच्या जमिनीचे विद्रुपीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदिश शेलकर यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक सुरेश कु-हाडे यांनी 24 डंपरवर गुन्हा नोंदवला आहे. त्यात MH-46-BU-5962, MH-01-FE-1132, MH-43-CK-9241, MH-01-CV-9203 सह एकूण 24 डंपरचा समावेश आहे. आरोपींवर भा.दं.वि. कलम 280, 268, 269, 336 सह महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपणास प्रतिबंध अधि. 1995 चे कलम 3 आणि महाराष्ट्र पोलीस अधि. 1951 चे कलम 120 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार दर्शन दिनानाथ कोळी हे सिडको नोडल ऑफिस डोणघरी येथे सहायक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पण नागरिकांचा संताप अजूनही शांत झालेला नाही. लोक म्हणतात "आज एका दिवसाची कारवाई झाली, पण महिनो-महिने इथे डेब्रिजचे डोंगर उभे राहिले तेव्हा कुठे होते अधिकारी? आता फोटो काढून गुन्हा दाखल केला आणि विषय संपला का? जोपर्यंत याला आळा बसत नाही तोपर्यंत ही कारवाई म्हणजे फक्त कागदावरची शाबासकी आहे".
सिडकोच्या जागा म्हणजे कुणाच्या बापाची शेतं नाहीत की जिथे कोणीही येईल आणि कचरा टाकून जाईल. प्रशासनाने आता केवळ गुन्हे नोंदवून न थांबता, रात्रीची गस्त आणि कठोर दंडाची तरतूद करावी अशी मागणी जोर धरत आहे. नाहीतर उद्या पुन्हा दुसरे 24 डंपर येतील आणि पुन्हा नवा गुन्हा दाखल होईल.


