हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 20/7/2026
सराटीत टाळ मृदंग हरी नामाच्या जय घोषणात तुकोबांच्या पादुकांचे निरास्नान; तर लाखो भाविकांच्या दर्शनानंतर पालखी सोहळा अकलूज कडे मुक्कामासाठी मार्गस्थ.
सराटी ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने तुकोबाच्या पादुकांना निरास्नान उत्साहात संपन्न.
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी- बाळासाहेब सुतार
सराटी (ता. इंदापूर) यथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सालाबाद प्रमाणे रविवार, दि. 19 जुलै रोजी सराटी येथे शेवटचा मुक्काम उत्साहात पार पडला. त्यानंतर सोमवार, दि. 20 जुलै रोजी पहाटेपासून टाळ-मृदंग, वीणा, अभंग आणि "ज्ञानोबा-तुकोबा"च्या अखंड जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सकाळी साडेसात वाजता निरा नदीच्या पवित्र पात्रात सराटी येथील सर्व ग्रामस्थ भाविक भक्त आणि वारकरी यांच्या हस्ते निरास्नान घालण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे महा पूजा व आरती करण्यात आली.
पहाटे पासूनच सराटी परिसरात वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पादुकांचे निरास्नान पार पडले. पालखी सोहळ्यामध्ये मेवा मिठाई खेळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात होते. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांनी निरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात पादुकांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला .
निरास्नानानंतर पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. पालखी रथ, दिंड्या आणि वारकरी पुन्हा शिस्तबद्ध पद्धतीने अकलूज मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ झाले. टाळ, मृदंग, विना आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
पालखी मार्गावरील भाविकांनी वारकऱ्यांवर फुलांची उधळण करून तसेच पिण्याचे पाणी, अल्पोपहार व इतर आवश्यक सेवांची व्यवस्था करून उत्स्फूर्त स्वागत केले.
सराटी येथील मुक्कामानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी अकलूजच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याला निरोप देताना बारामती प्रांत अधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, डीवायएसपी चैतन्य कदम, बारामती ॲडिशनल एस पी गणेश बिरादार, इंदापूर पीआय विलास नाळे, बावडा एपीआय गजानन चेके, प्रशासकीय अधिकारी एस एम गंजारे, पुणे जिल्हा बँक संचालक आपसाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रदीप जगदाळे, आण्णासाहेब कोकाटे, महेश जगदाळे, आमर जगदाळे, बापू कोकाटे, दीपक कोकाटे, बाबा कोकाटे, मनोज जगदाळे, भैय्या कोकाटे, भारत जगदाळे, योगेश काटे, सह सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी आणि सराटी येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले . भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी लाखो भाविक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
सराटी तालुका इंदापूर येथील निरा नदी पात्रात तुकोबारायाच्या पादुकाला नीरा स्नान घालीत असताना भाविक.


