हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 16/7/2026
उरणमध्ये गुटका बंदी आहे, पण भाव मात्र "विमान" गतीने वर! चारफाट्यापासून धुतूमपर्यंत डबल रेटचा धंदा जोरात.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 16 जुलै 2026: महाराष्ट्रात गुटका बंदी आहे हे फक्त पेपरवर लिहिलंय का काय? कारण उरण तालुक्यात सकाळी चहा सोबत आणि संध्याकाळी कटिंग सोबत गुटका मात्र हमखास मिळतो. फरक एवढाच की आता तो "ब्लॅकमध्ये" आणि "डबल रेटमध्ये" मिळतो.
उरण चारफाटा पासून सुरुवात करा तर बस स्टॉप, शाळेच्या गेट बाहेर, कॉलेजच्या कोपऱ्यावर आणि धुतूम सारख्या गावातल्या दिसायला एकदम भोळ्या भाबड्या पानटपरीवर सुद्धा आतमध्ये गुटक्याचा खजिना लपलेला आहे. वरून दिसायला फक्त पान-सुपारी, आतमध्ये मात्र "स्पेशल मेनू" चालू असतो. ग्राहकाने डोळा मारला की खालून पुडा बाहेर येतो आणि भाव ऐकून ग्राहकाचा डोळा मोठा होतो.
कारण काय तर "साहेब बंदी आहे ना, त्यामुळे रिस्क घ्यावी लागते." ही रिस्कची फी म्हणून 10 रुपयाचा गुटका 20 ला आणि 20 वाला 40 ला विकला जातो. नागरिक म्हणतात आम्ही व्यसन सोडायला गेलो तर खिशावर डल्ला मारून परत येतो.
प्रशासन कधीतरी येते, 2-4 हजाराचा माल पकडते, फोटो काढते आणि "मोठी कारवाई" झाली म्हणून बातमी लावते. दुसऱ्या दिवशी सकाळी तेच टपरीवाले नवीन स्टॉकसोबत आणि नवीन रेटसोबत हजर. म्हणजे कारवाई झाली की रेट अजून 5 रुपये वाढतो. ही बंदी आहे की गुटक्याचा भाव वाढवण्याची स्कीम हे कळत नाही.
शाळेत जाणाऱ्या मुलांना तर आता गणितही नवीन पद्धतीने शिकवले जाते. "बाळा 10 चा गुटका 20 ला मिळाला तर दुकानदाराला किती नफा झाला?"
स्थानिक नागरिक संतापून म्हणतात, "बंदीच्या नावाखाली आम्हालाच लुटलं जातंय. बंदी उठवा म्हणत नाही, पण एकतर पूर्ण बंद करा नाहीतर रेट तरी नॉर्मल ठेवा. ही डबल रेटची लूट थांबवा."
गुटका आरोग्यासाठी घातक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याहून घातक म्हणजे बंदीच्या नावाखाली होणारी ही लूट आहे. प्रशासनाने आता खऱ्या अर्थाने धडक कारवाई करून हा "महागडा नशा" स्वस्त करण्याऐवजी बंद करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


