हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 16/7/2026
"झाडे जगवा, उरण हिरवेगार करा" - एसटीच्या 78 व्या वर्धापनदिनी उरण आगारात 100 वृक्षांचे रोपण
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 14 जुलै 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज सकाळी 10.30 वाजता उरण बस आगारात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राज्यभरात "एसटी महामंडळातर्फे 14 जुलै रोजी राज्यभरात वृक्षारोपण उपक्रम" या अभियानांतर्गत उरण आगारात देखील बसस्थानक आणि आगार परिसरात 100 विविध जातींची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी आगार प्रमुख तुषार गंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सर्वांनी मिळून रोपांची लागवड केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रायगडभूषण श्री एल बी पाटील सर उपस्थित होते. त्यांनी झाडांचे महत्व पटवून देताना सांगितले की, "झाडे ही फक्त शोभेसाठी नाहीत. ती आपल्याला शुद्ध हवा देतात, पाऊस आणतात आणि उष्णता कमी करतात. झाडे लावणे महत्वाचे आहे तेवढेच त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्वाचे आहे. आज आपण लावलेली प्रत्येक झाड उद्या आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे."
आगार प्रमुख तुषार गंद्रे यांनी सांगितले की, एसटी महामंडळ केवळ वाहतूक सेवा देत नाही तर सामाजिक भान देखील जपते. राज्यातील सुमारे 1 हजार ठिकाणी असणाऱ्या बसस्थानके, आगार आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावला जात आहे. उरण आगारातील सर्व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होऊन लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आगारातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून "झाडे जगवा, उरण हिरवेगार करा" या संकल्पासह कार्यक्रमाची सांगता झाली.





