हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 9/7/2026
सोयगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४४ हजार ३०० रुपयांचे हातभट्टी दारूचे साहित्य उद्ध्वस्त.
दै. हिंदूसम्राट सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय काळे
सोयगाव :-पोलीस स्टेशन सोयगाव आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत मौजे गोंदेगाव-निंभोरा येथील धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर मोठा प्रहार केला. या कारवाईत एकूण ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, संबंधित तीन आरोपींविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ८५० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन (किंमत २९,७५० रुपये), ३० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (किंमत ३,००० रुपये) तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य (किंमत ११,५५० रुपये) असा एकूण ४४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस स्टेशन सोयगावचे प्रभारी अधिकारी दिनकर एस. गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी तडवी, जाधव, वाघ, बारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक एन. आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक ए. टी. बिडकर, व्ही. जी. साळुंखे, जवान आनंद शेदडकर, अमित नवगीरे, राहुल बनकर आणि सुरे यांनी संयुक्तपणे पार पाडली.
या प्रकरणी संबंधित तीन आरोपींविरुद्ध दारूबंदी विभाग, सिल्लोड येथे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून,अवैध दारू व्यवसायाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने संयुक्त मोहिमा राबविण्यात येत असून, अशा कारवायांमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


