हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 27/7/2026
आप्पाचीवाडीतील श्री हालसिद्धनाथ मंदिर परिसरात 47 लाखांच्या हायटेक शौचालय बांधकामाचा शुभारंभ.
आप्पाचीवाडी प्रतिनिधि उत्तम हेलाटे
आप्पाचीवाडी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथ मंदिराच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या हायटेक शौचालयाच्या बांधकामाचा शुभारंभ निपाणी मतदारसंघाच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष तथा माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि श्री हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी हरिदास पुजारी यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला.
श्री हालसिद्धनाथ मंदिरात दर रविवार, गुरुवार, अमावास्या तसेच यात्रेदरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसरात सुलभ शौचालयाची सुविधा नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा निवेदने देऊनही प्रश्न सुटला नव्हता.या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र येत हा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला. त्यांनी आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे निवेदन देऊन शौचालय उभारणीची मागणी केली होती. प्रारंभी 30 लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी तब्बल 47 लाखांचा निधी मंजूर करून तातडीने कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले यांनी भविष्यातही श्री हालसिद्धनाथ देवस्थानच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष के. बी. माने यांनी सांगितले की, सध्या मंदिर परिसरात सुमारे 87 लाखांची विविध विकासकामे सुरू असून, आगामी काळातही जोल्ले यांच्या माध्यमातून विकासाची गती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, श्री हालसिद्धनाथ कारखान्याचे अध्यक्ष व संचालक, देवस्थानचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


