हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 21/7/2026
उरण पोलिसांकडून 4 शाळा-महाविद्यालयात "विद्यार्थी सुरक्षा अवेअरनेस" मोहीम संपन्न.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 373 विद्यार्थ्यांना गुन्हेगारी व सायबर सुरक्षेचे धडे.
(पत्रकार /पुजा चव्हाण )
विद्यार्थ्यांमध्ये कायदा, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती याबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी उरण पोलीस ठाण्याच्या वतीने "विद्यार्थी सुरक्षा अवेअरनेस प्रोग्राम" राबविण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेश खांदवे, बीट मार्शल व गोपनीय शाखेच्या अमलदारांनी उरण परिसरातील चार शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
या मोहिमेअंतर्गत प्रथम कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण येथे भेट देण्यात आली. येथे 30 विद्यार्थी व 03 शिक्षकांच्या उपस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुन्हेगारी, सायबर फसवणूक आणि वाहतूक नियमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर जेएनपीटी टाऊनशिप येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर शाळेत 223 विद्यार्थी व 05 शिक्षकांना "गुड टच-बॅड टच", मोबाईलचा योग्य वापर आणि मित्रांसोबत वागताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील रायगड जिल्हा परिषद शाळा, बोकडवीरा येथे 24 विद्यार्थी व 02 शिक्षकांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, अनोळखी व्यक्तींपासून सावध कसे राहावे आणि पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती देण्यात आली. तर जेएनपीटी टाऊनशिप, राजर्षी शाहू महाराज शाळा, नवघर येथे 96 विद्यार्थी व 06 शिक्षकांसमोर सोशल मीडियाचा योग्य वापर, अफवांपासून सावध राहणे आणि पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवावेत यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सपोनि. राजेश खांदवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलिस हे केवळ कारवाईसाठी नसून ते विद्यार्थ्यांचे मित्र आहेत. कोणतीही अडचण आल्यास तातडीने 112 किंवा सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा. तसेच मोबाईलचा वापर शिक्षणासाठीच करावा आणि वेळेचा अपव्यय टाळावा असे आवाहन त्यांनी केले. बीट मार्शल आणि गोपनीय शाखेच्या अमलदारांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विविध गुन्ह्यांपासून दूर कसे राहावे याचे प्रात्यक्षिकही दाखवले.
एकूण या चारही ठिकाणी 373 विद्यार्थी व 16 शिक्षक या अवेअरनेस प्रोग्राममध्ये सहभागी झाले होते. शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी उरण पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून यापुढेही असे उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही मोहीम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे.





