स्व. प्रशांतभाऊ पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ उरण तालुक्यात भावपूर्ण आदरांजली; भक्तिमय कार्यक्रम, भजन-कीर्तन व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 19/6/2026

स्व. प्रशांतभाऊ पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ उरण तालुक्यात भावपूर्ण आदरांजली; भक्तिमय कार्यक्रम, भजन-कीर्तन व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप.


पत्रकार पूजा चव्हाण.

उरण, 19 जून 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा गुरुकुल ॲकॅडमीचे संस्थापक स्वर्गीय प्रशांतभाऊ बाळकृष्ण पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ उरण तालुक्यात शनिवार, 20 जून 2026 रोजी विविध ठिकाणी भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कर्तृत्ववान नेतृत्वाची व सामाजिक कार्याची आठवण जपत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जाणार आहे.  



जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटीचे बोर्ड मेंबर दिनेश पाटील यांच्या पुढाकाराने स्व. प्रशांतभाऊंना भक्तिमय आदरांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 20 जून रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 या वेळेत जेएनपीटी टाऊनशिप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न होणार आहे.  


उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या वतीने स्व. प्रशांतभाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जीवनमुक्त स्वामी मठ, अंबिकावाडी-नांगाव, उरण येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा भक्तिमय सोहळा होणार असून भाविकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून आदरांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  


याचबरोबर स्व. प्रशांतभाऊ पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजक मनोज भगत यांनी द्वितीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. शनिवार, 20 जून रोजी सकाळी 9 वाजता महात्मा गांधी विद्यालय, दिघोडे, ता. उरण येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचे स्व. प्रशांतभाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.  


स्व. प्रशांतभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून व गुरुकुल ॲकॅडमीच्या माध्यमातून उरण तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची व आठवणींची उजळणी करण्यासाठी तसेच त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या तिन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top