हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 27/6/2026
नेरेत महिला उत्कर्ष समितीचा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात; वटपौर्णिमेला प्रत्येकी एक झाड लावण्याचे आवाहन.
पत्रकार / पूजा चव्हाण
पनवेल :- पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापन झालेल्या महिला उत्कर्ष समितीच्या वतीने पनवेलजवळील नेरे येथील चार्वी फार्म परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वर्षावात निसर्गाच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पत्रकार उत्कर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, कोकण अध्यक्ष अलंकार भोईर, रायगड सचिव अशोक घरत आणि सदस्य सुनील भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, नवी मुंबई संघटक वर्षा लोकरे, नवी मुंबई उपाध्यक्ष विजया निमसे, ऐरोली अध्यक्ष मानसी धनावडे, मुंबई अध्यक्ष डॉ. संपदा कारेकर,तुर्भे अध्यक्ष वंदना अंबवले यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात नवी मुंबई सहसचिव पदी डॉ. दिपाली उमाले तर उलवे अध्यक्ष पदी मीरा जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली व उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. अशोक म्हात्रे म्हणाले की, आज महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक सक्षमीकरण होणे अधिक गरजेचे आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, बदलती सामाजिक परिस्थिती आणि मोबाईलचा अतिवापर यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी आपले परखड मत मांडले.
येणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला सदस्याने किमान एक झाड लावावे, असे आवाहन डॉ. म्हात्रे यांनी केले असून त्यांच्या या आवाहनाला उपस्थित भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी अनेक नवीन सदस्यांनी महिला उत्कर्ष समितीचे सदस्यत्व स्वीकारून समितीच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून उपस्थित महिलांनी कराओकेच्या तालावर बहारदार गाणी सादर करून सर्वांचे मनोरंजन केले आणि पावसाळी वातावरणात कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली.




