हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 27/6/2026
[] 'शेती तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह' कोळी येथे संपन्न []
प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची लागवड करत कायदेभंग आंदोलन.
हदगांव / प्रतिनिधी भगवान कदम
शेती तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह कार्यक्रम माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सदस्य गुणवंत पाटील हंगरगेकर, कृषी तंत्रज्ञान आघाडीचे अध्यक्ष मिलिंद दामले यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे व हदगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले होते.
शेतकऱ्यांचे लाचारीचे व गरिबीचे जीवन संपवून त्यांना सन्मानाने आणि वैभवात जगता यावे यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. या तंत्रज्ञानावर आधारित नवीन एचटीबीटी व बीजी फोर, बीजी फाईव्ह बियाणे तयार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी. आणि हे नवीन सुधारित बियाणे उपलब्ध करून देण्यास कंपन्यांना प्रतिबंध करू नये यासाठी शेतकरी संघटनेने खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यात हा सविनय कायदेभंग सत्याग्रह कार्यक्रम राबवला आहे. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी कृषी विभागाने धास्ती घेतली होती.
यावेळी बोलताना शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आघाडीचे अध्यक्ष मिलिंद दामले यांनी एचटीबीटी बियाणे काय आहे आणि त्यापासून शेतकऱ्यांचा फायदा काय आहे हे समजावून सांगितले.
शेतकरी संघटनेतर्फे तीन वेळा आमदार राहिलेले शेतकरी संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष वामनराव चटप यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली. आता यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शेती शक्य नाही आणि सरकार तंत्रज्ञान वापरण्यास परवानगी देत नाही. जर शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुले सक्षम झाली तर आपल्या पक्षाला कार्यकर्ते मिळणार नाहीत या भीतीने सरकार शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक बियाणे उपलब्ध करून देत नाही. या बियाण्यापासून उत्पादित झालेले धान्य आणि तेल खाल्ले तर कॅन्सर होते या सबबीखाली एचटीबीटी बियाण्याला परवानगी देत नाही. परंतु याच तंत्रज्ञानाने तयार झालेल्या इतर देशातील धान्य आणि तेल मात्र आयात करून लोकांना खाऊ घातले जात आहे. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे.
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सदस्य गुणवंत पाटील हंगरगेकर म्हणाले की, एचटीबीटी बियाणे गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात तयार होते. संपूर्ण गुजरातमध्ये याची लागवड सुद्धा होते. परंतु तिथे कोणतीही कारवाई केली जात नाही. म्हणून आम्ही हेच बियाणे वाजत गाजत महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला. गुजरात मध्ये कोणतीही कारवाई झाली नाही परंतु नंदुरबार जिल्ह्यात येतात महाराष्ट्र सरकारने अटकाव करून कार्यकर्त्यावर कारवाई केली. सरकारचा हा दुजाभाव शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे.
या कार्यक्रमात व्यापार आघाडी प्रमुख विजय निवल, युवा आघाडी माजी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, ॲड. धोंडीबा पवार, प्रतापराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
कोळी येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात गुरुवारी दिनांक २५ जून रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी रमेश मांगुळकर, दीपक आनंदवार, गोरख पाटील, राजेंद्र झोटिंग, सतीश दाणी, दासराव कातोरे, माधवराव शिंदीकर, आर.पी. कदम, दत्ता पाटील कोळीकर, संभाजी उंचाडकर, व्यंकटराव वडजे, शिवराज पाटील, प्रतापराव देशमुख, प्रभाकर देशमुख, प्रल्हाद पाटील हडसनीकर, खंडबाराव नाईक, खंडबाराव पोले, शंकरराव चव्हाण ईत्यादी सह अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.


