हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 5/6/2026
"जागतिक पर्यावरण दिनी न्हावा शेवा वाहतूक पोलिसांचा हरित उपक्रम; 'झाडे लावा, प्रदूषण घालवा' चा संदेश देत केले वृक्षारोपण"
पत्रकार / पूजा चव्हाण.
न्हावा शेवा, उरण - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या आवारात आज 05 जून 2026 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दररोज गाड्यांना सिग्नल देणारे वाहतूक पोलिसांचे हात आज निसर्ग संवर्धनासाठी सरसावले आणि 'वाहतूक नियमनासोबत पर्यावरण रक्षण' हा संदेश त्यांनी कृतीतून दिला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात न्हावा शेवा वाहतूक शाखेतील 08 पोलीस अंमलदार आणि 04 वाहतूक वार्डन यांनी सहभाग घेतला. यावेळी शाखेच्या आवारात आंबा, वड, पिंपळ, कडुनिंब यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक झाडांची रोपे लावण्यात आली. हातात रोपे घेऊन उभ्या असलेल्या पोलीस बांधवांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
"दरोज हजारो गाड्यांचा धूर, ध्वनी प्रदूषण यांचा सामना आम्ही करतो, त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व आम्हाला चांगलेच कळते. म्हणूनच फक्त दंडात्मक कारवाई न करता, सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती जगवणेही महत्त्वाचे असल्याने, लावलेल्या प्रत्येक रोपाची जबाबदारी संबंधित अंमलदारांनी घेतली आहे," असे व.पो.नि. वैशाली गलांडे यांनी सांगितले.
दरवर्षी 5 जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. 1972 साली संयुक्त राष्ट्रांनी मानवी पर्यावरणावरील परिषदेत या दिनाची घोषणा केली. वाढते प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड यांसारख्या गंभीर समस्यांबाबत जनजागृती करणे आणि पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील होणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 2026 ची थीम 'वाळवंटीकरण रोखा, जमीन पुनर्संचयित करा' अशी असून, वृक्षारोपण हा त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय मानला जातो. न्हावा शेवा हे औद्योगिक व बंदर क्षेत्र असल्याने येथे वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन वृक्षारोपण करणे ही निश्चितच कौतुकास्पद व अनुकरणीय बाब असून 'खाकी'तील या 'हिरव्या' उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



