जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 5/6/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण

नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड.


 नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे :

सध्या वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहता वसुंधरेची जपणूक केली नाही तर घातक परिणाम सोसावे लागतात हे दिसून येत असून प्रत्येक माणसाने एक झाड लावून ते जगवले तर काही प्रमाणात हा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल अशा शब्दात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व विशद केले.


  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने हार्टफुलनेस एन्स्टिट्यूट व अदानी रिॲलिटी या संस्थेच्या सहयोगाने पारसिक हिल येथे 200 हून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, मालमत्ता विभाग उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे, उद्यान विभागाच्या सहा.आयुक्त श्रीम. ऋतुजा गवळी, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त श्री. प्रशांत नेरकर, सहा.उदयान अधिकारी श्री. भालचंद्र गवळी, उदयान अधिक्षक श्री. प्रकाश गिरी व श्री. विजय कांबळे, उदयान सहाय्यक श्री. राज बांगर तसेच हार्टफुलनेस एन्स्टिट्यूट संस्थेचे पदाधिकारी श्री. कमलेश पटेल व श्रीम. निवेदिता श्रेयांश, अदानी रिॲलिटीचे पदाधिकारी श्री. अन्नू जयबालन व श्री. प्रशांत राजहंस आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


 विशेष म्हणजे वृक्षारोपण करतांना बकुळ, बाहवा, निंब अशा देशी वृक्षरोपांची लागवड करुन जैवविविधतेला प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षरोपाच्या ठिकाणी ज्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले त्या व्यक्तीच्या आईच्या नावाचा फलक ‘एक वृक्ष आईच्या नावाने (एक पेड माँ के नाम)’ या अभिनव उपक्रमांतर्गत लावण्यात आला.

          या उपक्रमाबद्दल बोलतांना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे स्थान सर्वात मोठे असते, त्यामुळे आजच्या वृक्षारोपणाला आईच्या नावाचा भावनात्मक स्पर्श होता असे सांगितले. आपल्या आईप्रमाणेच पृथ्वी अर्थात वसुंधरा ही देखील आपली आई असून तिची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

           हा उपक्रम एका दिवसापुरता मर्यादित न राहता ही सातत्याने सुरु राहणारी चळवळ व्हावी अशी भूमिका व्यक्त करीत आयुक्तांनी आज पारसिक हिलवर लावण्यात येणा-या 200 हून अधिक देशी वृक्षरोपांप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये 2000 हून अधिक वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे सांगितले. वर्षभरात योग्य ठिकाणी 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

           या वृक्षारोपणाप्रसंगी पिल्लई महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे पारसिक हिल परिसरात दररोज मॉर्निग वॉकसाठी येणारे नागरिक देखील या पर्यावरणशील उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

           वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उपयोग या वृक्षांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिली व एका ध्यासाने सर्वजण एकत्र आले तर पर्यावरण जपणूक व संवर्धनाचे कार्य यशस्वी होईल असा विश्वासही व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top