"जेएनपीएचा 'ग्रीन पोर्ट'चा निर्धार; जागतिक पर्यावरण दिनी 'एक पेड माँ के नाम'पासून ई-टग्सपर्यंत हरित क्रांतीचा जागर"

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 5/6/2026

"जेएनपीएचा 'ग्रीन पोर्ट'चा निर्धार; जागतिक पर्यावरण दिनी 'एक पेड माँ के नाम'पासून ई-टग्सपर्यंत हरित क्रांतीचा जागर"


पत्रकार / पूजा चव्हाण.

मुंबई, 5 जून 2026 - देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) जागतिक पर्यावरण दिन 2026 विविध जनजागृती व शाश्वतता उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. 'निसर्गाकडून प्रेरणा, हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी' या यंदाच्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांद्वारे जेएनपीएने पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी आणि 'ग्रीन पोर्ट' उभारणीचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला.



कार्यक्रमाची सुरुवात 'एक पेड माँ के नाम' या भावनिक उपक्रमाने झाली. जेएनपीएचे अध्यक्ष श्री. गौरव दयाल, भा.प्र.से. यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्याची बांधिलकी व्यक्त केली. बंदर परिसरात आयोजित पथनाट्याद्वारे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व आणि जबाबदार आचरणाची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली.



याप्रसंगी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना अध्यक्ष श्री. गौरव दयाल म्हणाले, "जागतिक पर्यावरण दिन हा केवळ वर्षातून एकदा साजरा केला जाणारा उपक्रम नसून पर्यावरण संवर्धन ही आपली सातत्यपूर्ण जबाबदारी असल्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. शाश्वत विकास, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि सामुदायिक सहभागाची संस्कृती रुजविण्यासाठी जेएनपीए कटिबद्ध आहे. आज आपण केलेले प्रत्येक छोटे पाऊल भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक हिरवेगार, सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडविण्यात मोलाचे योगदान देते."



पर्यावरण विषयक सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी 'इको कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळा' घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार अध्यक्ष दयाल यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जेएनपीएच्या सोशल मीडिया हँडलवर परस्परसंवादी पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा आयोजित करून व्यापक जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, सामाजिक उत्तरदायित्व जपत जेएनपीएने 'आई डे केअर फाउंडेशन' या विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेसोबत सहयोग केला. या मुलांना कार्यक्रमात सहभागी करून घेऊन पर्यावरण संरक्षण ही समाजातील सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.


*जेएनपीएचे 'ग्रीन पोर्ट' उपक्रम:*  

जेएनपीएकडून व्यापक ग्रीन पोर्ट उपक्रम आणि पर्यावरण कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. बंदर परिसरातील चार तलावांचे यशस्वी पुनरुज्जीवन करण्यात आले असून आणखी दोन तलावांचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरण, हरित पट्ट्यांचा विकास, खारफुटी क्षेत्रांचे संवर्धन तसेच मियावाकी पद्धतीने 1.11 लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि ध्वनी प्रदूषण यांचे नियमित निरीक्षण करण्यासाठी जेएनपीएकडे अत्याधुनिक स्वतंत्र पर्यावरण प्रयोगशाळा कार्यरत आहे.


अक्षय ऊर्जेचा वाढता वापर, शाश्वत लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन, धूळ नियंत्रण, प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर तसेच ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधांच्या उभारणीत जेएनपीए उल्लेखनीय प्रगती करत आहे. 'मॅरिटाईम इंडिया व्हिजन 2030' आणि 'हरित सागर ग्रीन पोर्ट' मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत.


*भविष्यातील हरित पावले:*  

जेएनपीए हरित बंदर संचालनासाठी 60 टन बोलार्ड पुल क्षमतेच्या इलेक्ट्रिक टगबोटी (ई-टग्स) कार्यान्वित करणार आहे. या ई-टग्सच्या बॅटरी चार्जिंगसाठी विद्यमान टग जेटीवर शोर पॉवर पायाभूत सुविधा विकसित केली जात असून मार्च 2027 पर्यंत या ई-टग्स कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. शोर पॉवर पुरवठ्यामुळे दरवर्षी सुमारे 500 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात बचत होणार आहे. याशिवाय, जहाजांना शोर पॉवर पुरवठा करण्याच्या प्रायोगिक प्रकल्पासाठी जीटीआय आणि जेएनपीए यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.


या कार्यक्रमाला जेएनपीएचे संचालक मंडळ सदस्य, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध भागधारक गटांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक जबाबदार बंदर प्राधिकरण म्हणून जेएनपीए आपल्या सर्व कार्यप्रणालींमध्ये पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतींचा सातत्याने अवलंब करत असून हरित आणि जबाबदार विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top