"उरणच्या करंजा सोसायटीत मच्छिमारांची महत्त्वाची बैठक: पावसाळी मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी, सागरी सुरक्षेवर भर".

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 22/6/2026

"उरणच्या करंजा सोसायटीत मच्छिमारांची महत्त्वाची बैठक: पावसाळी मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी, सागरी सुरक्षेवर भर".


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, दि. 22 जून 2026:- 

पावसाळी मासेमारी बंदी कालावधीच्या पार्श्वभूमीवर उरण व मोरा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मच्छिमार सोसायटी अध्यक्ष, पदाधिकारी व मच्छिमार बांधवांची एक महत्त्वाची बैठक आज करंजा मच्छिमार सोसायटी, करंजा, ता. उरण येथे पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी, उरण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 22/06/2026 रोजी सकाळी 11:00 ते 12:05 या वेळेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने माहे जून 2026 ते माहे जुलै 2026 या दोन महिन्यांसाठी पावसाळी मासेमारी बंदी लागू केली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि सागरी सुरक्षा अबाधित राहावी, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.



सदर बैठकीत उपस्थित मच्छिमार बांधवांना प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पावसाळी बंदी कालावधीत खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यास सक्त मनाई असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. याशिवाय अवैध धंद्यांसाठी होडी किंवा बोटीचा वापर करू नये, समुद्र व खाडी किनारी भागात सतत सतर्क राहून लक्ष ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या. समुद्रमार्गे होणाऱ्या देशविघातक कृत्यांबाबत काही संशयित इसम किंवा बोट निदर्शनास आल्यास तात्काळ कोस्टल हेल्पलाईन क्रं. 1093, डायल क्रं. 112 किंवा उरण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. तसेच बोटी किंवा होडीवर कामावर ठेवण्यात आलेल्या इसमांची चारित्र्य पडताळणी करून त्याचा अहवाल प्राप्त करून घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा कालावधीत भरकटलेल्या किंवा वाहून आलेल्या बोट, जहाज, टग, बार्जबाबत स्थानिक पोलीस ठाणे, पोर्ट विभाग, कस्टम विभाग, भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौसेना व नियंत्रण कक्ष, नवी मुंबई यांना कोस्टल हेल्प लाईन 1093 व डायल 112 वर तात्काळ माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.



या बैठकीत उपस्थित मच्छिमार बांधवांनी माहे जून मध्ये पावसाळी कालावधीत बोटी बंद करून प्रशासनास पूर्ण सहकार्य केले असून यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या अडीअडचणी व समस्यांचे निराकरणही यावेळी करण्यात आले. सदर बैठकीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी, उरण पोलीस ठाणे स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत सागरी सुरक्षा शाखेचे वपोनिरी संतोष काणे, पोउपनिरी जयराम पाटील, मोरा सागरी पोलीस ठाणे तसेच सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे, उरण हेही उपस्थित होते. करंजा मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदिप नाखवा यांच्यासह इतर मच्छिमार सोसायटींचे पदाधिकारी आणि अंदाजे 125 ते 150 मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने या बैठकीला हजर होते. 


पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी धोकादायक ठरते, तसेच हा कालावधी मत्स्य प्रजननाचा असल्याने शासनाकडून दरवर्षी 1 जून ते 31 जुलै या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. या बंदीची प्रभावी अंमलबजावणी आणि किनारपट्टीची सुरक्षा यासाठी पोलीस व मत्स्य विभागाकडून संयुक्त प्रयत्न केले जात आहेत. सागरी मार्गाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये यासाठी मच्छिमार हे ‘समुद्राचे डोळे’ म्हणून काम करत असून त्यांच्या सहकार्याने किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top