जेएनपीएत आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 उत्साहात साजरा; “योगा फॉर हेल्थी एजिंग” या संकल्पनेवर भर.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 21/6/2026

जेएनपीएत आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 उत्साहात साजरा; “योगा फॉर हेल्थी एजिंग” या संकल्पनेवर भर.


पत्रकार / पूजा चव्हाण.

मुंबई, दि. 21 जून 2026 (प्रतिनिधी) :  भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 मोठ्या उत्साहात साजरा केला. आयुष मंत्रालयाच्या निर्देशांनुसार तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार जेएनपीएच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यंदाच्या वर्षीची जागतिक संकल्पना “योगा फॉर हेल्थी एजिंग” अर्थात “निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही होती.



कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जेएनपीएने तज्ज्ञ योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगसत्राचे आयोजन केले होते. त्यानंतर ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना गहन ध्यानधारणेचे सत्र घेतले. या सत्रांमध्ये जेएनपीएचे अध्यक्ष श्री. गौरव दयाल, भा.प्र.से., उपाध्यक्ष श्री. रविश कुमार सिंह, भा.रे.वा.से., सीआयएसएफ कमांडंट, सीआयएसएफ जवान तसेच जेएनपीएचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्रितपणे आरोग्य आणि सजगतेची भावना आत्मसात केली.



याप्रसंगी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष श्री. गौरव दयाल म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या सर्वांना थांबून स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची आणि दीर्घकालीन आरोग्य, आनंद व कल्याणासाठी योगदान देणाऱ्या सवयी अंगीकारण्याची अनोखी संधी देतो. योग हे भारताच्या प्राचीन ज्ञानाचे अमूल्य देणे आहे, जे आजही जगभरातील लोकांना संतुलित आणि निरोगी जीवनशैलीकडे मार्गदर्शन करत आहे. योग ही निरोगी जीवनाची पद्धत आहे. आपण एक जेएनपीए कुटुंब म्हणून हा दिवस उत्साहाने, वचनबद्धतेने आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याच्या सामूहिक संकल्पाने साजरा करतो.”



योगाचे महत्त्व अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी आणि जनसहभाग वाढवण्यासाठी जेएनपीएने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विशेष योग दिन सोशल मीडिया मोहीमही राबवली. या मोहिमेद्वारे योगाचे महत्त्व आणि यंदाची संकल्पना “योगा फॉर हेल्थी एजिंग” याचा प्रचार करण्यात आला.


अशा उपक्रमांच्या माध्यमातून जेएनपीए आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि काम-जीवन समतोलाची संस्कृती रुजवत आहे. त्याचबरोबर योगाला जीवनाचा एक भाग बनवण्याच्या राष्ट्रीय चळवळीतही जेएनपीए योगदान देत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top