सक्तीने स्मार्ट मीटर बसवणे खपवून घेणार नाही; राजेंद्र भाटळे यांचा महावितरणला इशारा.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 16/6/2026

सक्तीने स्मार्ट मीटर बसवणे खपवून घेणार नाही; राजेंद्र भाटळे यांचा महावितरणला इशारा.




  राधानगरी हिंदूसम्राट प्रतिनिधी संजय कांबळे

 राधानगरी ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची स्मार्ट मीटर विषयक जनजागृती बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर योजनेला तीव्र विरोध दर्शवित महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.यापूर्वी ग्रामसभेत स्मार्ट मीटरविरोधी ठराव मंजूर करून महावितरणला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही राधानगरी शहरातील काही भागांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.बैठकीत महावितरणच्या राधानगरी शाखेच्या अभियंता ममता पाटील यांनी स्मार्ट मीटरचे फायदे आणि त्यामागील उद्दिष्टे याबाबत माहिती दिली. यावेळी बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे यांनी महावितरणकडून ग्रामपंचायतीला बैठकीसाठी उशिरा नोटीस देण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामसभेने स्पष्ट विरोध नोंदवूनही काही ग्राहकांवर सक्ती करून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारची सक्ती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान, ऑनलाइन वीज बिल भरणा करताना ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर अभियंता ममता पाटील यांनी महावितरणच्या अधिकृत ॲपद्वारे वीज बिल भरल्यास काही प्रमाणात सवलत मिळू शकते, असे स्पष्ट केले. यावेळी अजिंक्य वाडकर यांनी वीज बिलांमध्ये विविध प्रकारचे अतिरिक्त आकार लावून ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला. तसेच महावितरण ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.एकूणच या जनजागृती सभेत उपस्थित ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर योजनेविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्याचे दिसून आले.बैठकीस सरपंच सविता भाटळे, उपसरपंच वैशाली किल्लेदार,बिद्री संचालक राजेंद्र भाटळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदा पवार, प्रकाश बालणकर, ऋतुजा म्हापसेकर, शिवाजी किल्लेदार, अरविंद पोवार, राजेंद्र म्हापसेकर, विकास पाटील, अजिंक्य वाडकर, सुजित साळुंखे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top