शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

*माऊलीच्या आळंदीतून पुण्याच्या भवानी पेठेत ४० वर्षे ज्ञानदीप तेवत आणणाऱ्या मुख्याध्यापिका हेमलता कुऱ्हाडे यांचा सेवापूर्ती गौरव*

हिंदू सम्राट पुणे प्रतिनिधी अनिल गवळी.



*पुणे, भवानी पेठ* – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन आळंदी नगरीतून दररोज पहाटे निघून पुण्याच्या भवानी पेठेतील बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेत ज्ञानदीप तेवत आणणाऱ्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता नंदकुमार कुऱ्हाडे यांनी ३९ वर्षे १० महिन्यांची प्रदीर्घ व तपस्वी सेवा पूर्ण करून वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शाळेत भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.



*आळंदी ते भवानी पेठ: निष्ठेचा अखंड प्रवास*  

चार दशकाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात ज्ञानज्योत तेवत ठेवलेल्या कुऱ्हाडे मॅडम आळंदीहून दररोज पहाटे पुण्यात शिकवायला येत होत्या. पावसाळा असो वा कडक ऊन, इंद्रायणीच्या तीरावरून निघालेली त्यांची ज्ञानवारी एकही दिवस चुकली नाही. शिस्त आणि वेळेच्या बाबतीत त्या ‘टॉप टीप’ होत्या. आळंदीच्या माऊलींचा सेवाभाव आणि पुण्याची शिस्त या दोन्हींचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. चार दशके विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.


*सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती*  

या सेवापूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मा. सुनिलजी कुऱ्हाडे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सुनिलभाऊ पवार होते. याप्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. कविता ताई पवार, सहसचिव बोराटे सर, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सहकुटुंब उपस्थित होते.


*कुटुंबियांसह झाला सन्मान*  

उत्सवमूर्ती मुख्याध्यापिका मा. सौ. हेमलता नंदकुमार कुऱ्हाडे यांचे पती मा. श्री. नंदकुमार पंढरीनाथ कुऱ्हाडे, वयोवृद्ध सासूबाई श्रीमती यशोदा पं. कुऱ्हाडे, जावई आदित्य दिलीप तापकीर व त्यांचे माहेर व सासरचे सर्व आप्तस्वकीय उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी व माजी मुख्याध्यापिका, शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.



*मनोगतातून व्यक्त झाली कृतज्ञता*  

सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे सुनिल कुऱ्हाडे, संस्थेच्या सचिव कविता ताई पवार, सहसचिव बोराटे सर, पुजारी मॅडम, राऊत मॅडम, तनुजा मॅडम, सुवर्णा बोराटे मॅडम, मानसी टापरे, सागरभाऊ घुले तसेच अनेक माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून मॅडमच्या कार्याचा गौरव केला.

सौ. कुऱ्हाडे बाईंची मुलगी ऋतुजा आदित्य तापकीर यांनी आईविषयी बोलताना सांगितले, "कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले निस्सीम प्रेम यामुळेच माझी आई सर्वांसाठी आदर्श ठरली." नात ओवी हिनेही आजीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना सौ. कुऱ्हाडे मॅडम यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी देणगी स्वरूपात धनादेश सुपूर्द केला.

*नियोजन व सूत्रसंचालन*  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नेटके नियोजन सौ. कामिनी शेंगाळे यांनी केले, तर सूत्रसंचालनाची धुरा सौ. जयश्री हंगे यांनी लीलया सांभाळली.

*एक सुवर्णपर्वाची सांगता*  

आळंदीच्या माऊली नगरीतून निघून पुण्याच्या भवानी पेठेत चार दशके ज्ञानदीप तेवत ठेवणाऱ्या हेमलता मॅडम यांची सेवानिवृत्ती म्हणजे बापूसाहेब पवार शाळेच्या इतिहासातील एका तेजस्वी पर्वाची सांगता आहे. त्यांनी रुजवलेले शिस्त व संस्कारांचे बीज यापुढेही वटवृक्ष होऊन सावली देत राहील.


---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top