हिंदुसम्राट न्यूज
9/5/2026
*उरणमध्ये २.७८ किलो गांजासह बिहारचा तस्कर जेरबंद; उरण पोलिसांची धडक कारवाई*
पत्रकार पूजा चव्हाण.
*उरण, दि. ८ :* अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात उरण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत बिहारमधील एका तरुणाला २ किलो ७८० ग्रॅम गांजासह रंगेहात अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे २ लाख ७८ हजार रुपये आहे. मनीरूल अयनुल हक (वय ३९, व्यवसाय कांदा-बटाटा विक्री, सध्या रा. एकतानगर झोपडपट्टी, पुनीत कॉर्नर, एपीएमसी, वाशी, मूळ रा. ईदलपूर, जि. किशनगंज, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक ८ मे रोजी सायंकाळी पाच वाजून अकरा मिनिटांच्या सुमारास दशमिश खालसा ढाबा, डी.आर.टी. ब्रिजजवळ, रिलायन्स रोड, पागोटे येथे एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती उरण पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बसवराज सकपाळ यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजेश खांदवे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, संजय राठोड व पथकाने तात्काळ सापळा रचला. संशयितरित्या उभा असलेल्या मनीरूल हक याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीत हिरवट तपकिरी रंगाचा, तीव्र उग्र वासाचा, पाने, फुले, बिया व काड्या मिश्रित २ किलो ७८० ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३४/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी अटक करून अटकेची कारणे लेखी कळवण्यात आली. एनडीपीएस कायद्यानुसार २.७८ किलो गांजा ‘मध्यम मात्रा’ या श्रेणीत येत असून या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंडाची तरतूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त किशोर गायखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, पोलीस निरीक्षक प्रविण कदम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, संजय राठोड उपस्थित होते. फॉरेन्शिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून नमुने घेतले.
आरोपी हा मूळचा बिहारचा असून सध्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय करतो. हा गांजा त्याने कोठून आणला, कोणाला विकणार होता व यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे करत आहेत. आंतरराज्यीय तस्करीची शक्यता असल्याने तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
उरण पोलीस ठाण्यापासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर ही कारवाई झाली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत उरण पोलिसांची ही आणखी एक महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. नागरिकांनी अशा संशयित हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी केले आहे.



