हिंदुसम्राट न्यूज
उरणमध्ये ‘डॅशिंग नगरसेवक चषक २०२६’चा झंझावात; अंतिम लढतीत एकता कोटनाका संघाचा डंका, तेजस भोईर ठरला मालिकावीर.
पत्रकार / पूजा चव्हाण
उरण, दि. ४ : अश्विन पाटील मित्र मंडळ व गणेश पाटील मित्र मंडळ आयोजित आणि उरण नगरपालिकेचे नगरसेवक गणेश सदाशिव पाटील नगरसेविका सौ. सायली विशाल पाटेकर पुरस्कृत 'प्रकाशझोतातील नाईट अंडरआर्म डॅशिंग नगरसेवक चषक २०२६' ही भव्य क्रिकेट स्पर्धा शनिवार २ मे आणि रविवार ३ मे रोजी उरण सातरहाटी ते नगरपरिषद मागील मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडली. उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकता कोटनाका संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन भाजपचे १२ नगरसेवक, प्रसिद्ध उद्योगपती कौशिक शेठ, उपनगराध्यक्ष रवी भोईर, राज दीपक ठाकूर, सीमा घरत आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात रात्रीच्या प्रकाशझोतात झालेल्या चुरशीच्या लढतींनी हजारो क्रीडाप्रेमींना खिळवून ठेवले. अंतिम सामन्यात एकता कोटनाका संघाने विजय मिळवत प्रथम क्रमांकासह ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक पटकावला. कट्टा ग्रुप करंजा संघाने द्वितीय क्रमांकासह २५ हजार रुपये, कवंढाळ तळे पेण संघाने तृतीय क्रमांकासह १२ हजार रुपये तर अजय ७४ कोटनाका संघाने चतुर्थ क्रमांकासह १२ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले.
स्पर्धेदरम्यान वैयक्तिक चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. मालिकावीराचा बहुमान एकता कोटनाकाचा तेजस भोईर याला मिळाला असून त्याला गोल्ड कॉईन व फ्रीज देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून करंजाच्या बंटी म्हात्रे याला सायकल, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून करंजाच्याच परेश भोईर याला सायकल तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पेणच्या राहुल याला सायकल प्रदान करण्यात आली. 'चौकार किंग' या विशेष पुरस्काराने सन्मानित खेळाडूला कुलर भेट देण्यात आला.
सामने सुरू असताना उरणमधील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यासपीठावर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी विशेष 'शो मॅच'चे आयोजन करण्यात आले होते. हा सामना उरण पोलीस महिला संघ विरुद्ध फ्रेंड्स क्लब उरण महिला संघ यांच्यात खेळवण्यात आला व त्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सामन्याचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
नगरसेविका सायली विशाल पाटेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेने उरणमधील क्रीडाप्रेमींना मोठी पर्वणीच दिली. शिस्तबद्ध नियोजन, दर्जेदार खेळ व चुरशीच्या सामन्यांमुळे ही स्पर्धा उरण परिसरात विशेष गाजली. क्रिकेटच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणून त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्याचा आयोजकांचा उद्देश सफल झाला असून अशा स्पर्धा दरवर्षी व्हाव्यात, अशी मागणी क्रीडारसिकांकडून होत आहे. विजेत्या एकता कोटनाका संघाचे व यशस्वी आयोजनाबद्दल अश्विन पाटील मित्र मंडळ, गणेश पाटील मित्र मंडळ व नगरसेविका सायली विशाल पाटेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





