शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 उरणच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेचे यशाचे दशक; श्रीकांत सांगोलकरची नवी मुंबई पोलीस दलात भरारी, नगराध्यक्षा घाणेकर यांच्या हस्ते सत्कार

पत्रकार / पूजा चव्हाण.



*उरण, दि. ०७/०५/२०२६ :* उरण नगरपरिषद संचलित माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथील अभ्यासिकेत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कु. श्रीकांत सांगोलकर याने नवी मुंबई पोलीस दलात निवड होऊन उरणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांच्या हस्ते श्रीकांतचा शाल-श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. 


विशेष म्हणजे, या अभ्यासिकेने स्थापनेपासून अवघ्या चार वर्षांत यशाचे दशक साजरे केले आहे. श्रीकांतची निवड ही या अभ्यासिकेची दहावी यशोगाथा ठरली आहे. सदर अभ्यासिका तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्री. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर श्रीकांतने हे यश संपादन केले आहे.



यापूर्वीही या अभ्यासिकेतील ९ विद्यार्थी एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, मुंबई महापालिका तसेच खासगी कंपन्यांमध्ये निवडले गेले आहेत. उरणमधील ही एकमेव मोफत अभ्यासिका असून, येथे वेळेचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाची उत्तम संधी मिळत आहे. नगरपरिषदेचा हा उद्देश सफल होत असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

सत्काराला उत्तर देताना श्रीकांत सांगोलकर म्हणाला, “इथे वेळेचे बंधन नसल्याने मला अभ्यासाला पूर्ण वेळ देता आला. ग्रंथपाल श्री. संतोष पवार आणि सहाय्यक श्री. जयेश वत्सराज यांचे योग्य वेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. माझ्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.” 

यावेळी उपस्थित ॲड. निरंतर सावंत यांनी श्रीकांतला मार्गदर्शन करताना सांगितले, “आता इथेच थांबायचे नाही. पुढील परीक्षांसाठी अशीच मेहनत घे.” सहाय्यक जयेश वत्सराज म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीकांतने हे यश मिळवले आहे. तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” ग्रंथपाल संतोष पवार यांनी सांगितले, “श्रीकांतची जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीवर मात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती यामुळेच हे यश शक्य झाले.” यावेळी वाचनालयाच्या वतीने श्रीकांतसह त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई-वडिलांचाही सन्मान करण्यात आला.

नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांनी श्रीकांतचे अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभ्यासिकेस मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. “अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. नगरपरिषदेमार्फत यापुढेही विद्यार्थ्यांसाठी इन्व्हर्टर व इतर सुविधा अधिक सक्षमपणे पुरवल्या जातील,” अशी ग्वाही नगराध्यक्षा घाणेकर यांनी दिली.

श्रीकांतच्या या निवडीमुळे अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उरणच्या या ज्ञानमंदिरातून अशीच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top