हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 30/5/2026
शेकाप तालुका चिटणीस तथा माजी उपसभापती राजेश केणी यांचे प्रसंगावधान; आदिवासी वाडीत मानवतेचे दर्शन, विषप्राशन केलेल्या महिलेला तातडीची मदत.
पनवेल, ता. ३१ (प्रतिनिधी अशोक घरत) :
वाकडी आदिवासी वाडी येथील एका महिलेने विषप्राशन केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती मिळताच ‘जाणीव’ सामाजिक संस्थेशी संबंधित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने संबंधित महिलेचा जीव वाचविण्यास मदत झाली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे.
राजेश केणी आणि शशिकांत पाटील हे वाकडी आदिवासी वाडी येथे गेले असता, परिसरात अचानक गर्दी झालेली दिसून आली. चौकशी केली असता एका महिलेने विषप्राशन केल्याचे समजले. कुटुंबीयांनी तिला स्थानिक क्लिनिकमध्ये नेले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला होता.
रुग्णाच्या कुटुंबीयांची आर्थिक व मानसिक अवस्था पाहून, तेथील परिस्थितीचा अंदाज घेत त्वरित त्या लोकांना धीर देऊन सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शेकापचे तालुका चिटणीस सन्माननीय श्री. राजेश केणी साहेब आणि शशिकांत पाटील यांनी तातडीने मदतीचा निर्णय घेतला. एमजीएम रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ‘जाणीव’ सामाजिक संस्थेचे सदस्य अण्णासाहेब पाटील यांच्याशी ॲम्ब्युलन्ससाठी संपर्क साधण्यात आला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिलेला स्वतःच्या कारमध्ये पाच जणांची बसण्याची व्यवस्था असतानाही सात जणांना बसवून त्या वाहनातून सुकापूर येथील ‘श्री हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉ. संतोष कोडक यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे रुग्णालयात आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. उपचारादरम्यान संबंधित महिलेने फिनाईलचे विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करून विषारी द्रव बाहेर काढण्याची प्रक्रिया राबविली.
रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर तिच्या उपचाराचा येणारा खर्च पूर्णपणे उचलण्याची जबाबदारीही ‘जाणीव’ संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेश केणी यांनी स्वीकारली. औषधोपचारासह कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात आली.
दरम्यान, काही वेळानंतर संबंधित महिला शुद्धीवर आली असून तिला पुढील २४ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हॉस्पिटलमधून बाहेर पडताना संबंधित महिलेच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी कृतज्ञतेपोटी मदतीसाठी धावून आलेल्या कार्यकर्त्यांच्या पायावर डोके ठेवण्याचा प्रयत्न केला. भावना व्यक्त करताना महिलेच्या वडिलांनी, “राजेश केणी साहेब, आम्ही तुमचे फोटो फक्त बॅनरवर पाहिले होते; पण आज तुम्ही आमच्या मुलीला वाचवण्यासाठी देवदूत बनून आलात,” असे उद्गार काढले. या शब्दांनी उपस्थित सर्वांनाच भावूक केले.
सामाजिक कार्य म्हणजे केवळ प्रसिद्धी नव्हे, तर संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, याची प्रचिती या घटनेतून आली. एका आदिवासी पाड्यातील महिलेच्या जीवासाठी वेळेशी स्पर्धा करत केलेल्या या मदतकार्यामुळे मानवतेचे दर्शन घडले. संकटाच्या क्षणी माणूस म्हणून पुढे येणे आणि गरजूंना आधार देणे, हेच खऱ्या समाजकारणाचे मूल्य असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


