हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 29/5/2026
खत-बियाण्यांबाबत अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा – भारत कासार..जादा दर, कृत्रिम टंचाई व गैरप्रकारांवर कृषी विभाग ठेवणार करडी नजर....
दैनिक हिंदुसम्राट सोयगाव प्रतिनिधी विजय काळे
सोयगाव:- शहरासह तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यातील तसेच शहरासह परिसरातील शेतकऱ्यांना खत, बियाणे व कृषी साहित्य खरेदी करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे. शेतकऱ्यांना वेळेत व योग्य दरात दर्जेदार बियाणे व खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाकडून विशेष नियंत्रण ठेवण्यात येत असून तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या तालुक्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे व खत खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळत आहेत. या काळात काही विक्रेत्यांकडून जादा दर आकारणे, विशिष्ट कंपन्यांच्या खत-बियाण्यांची सक्ती करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. तालुक्यातील सर्व परवानाधारक कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.शेतकऱ्यांनी खत व बियाणे खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, खरेदीची पावती घ्यावी तसेच पॅकेटवरील किंमत, उत्पादन तारीख व वैधता तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अथवा पुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाल्यास संबंधित सोयगाव कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्याचे तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पडावा आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले.
संपर्क अधिकारी :रमेश गुंडीले
कृषी अधिकारी, सोयगाव
मो. 9185220269,संतोष भालेराव
कृषी अधिकारी (गोंदेगाव ते कंकराळा परिसर)
मो. 9303939805
शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच खत व बियाणे खरेदी करावे तसेच कोणतीही अडचण असल्यास कृषी विभागाशी थेट संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे


