हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 29/5/2026
गोठ्यात बैल नाहीत अन् ट्रॅक्टरला डिझेल नाही खरिपाची पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली!!...
उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे.
उमरी :-शेतीचा भार ज्यांच्या मानेवर होता त्या बैल जोडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि शेतीच्या कामासाठी यांत्रिकीकरणाचा स्वीकार करत ट्रॅक्टरचा सहारा घेतला. पण आज गोठे ओस पडले असून ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने खरीपाची पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.
उमरी तालुक्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथील माणसांचं जगणं शेतीवर अवलंबून आहे. शेती आहे तेवढीच राहिली पण लोकसंख्या वाढल्यामुळे एका घराची चार घर झाले. एक सातबारावर चार नावे आली. पुढे या चार सातबार्याचे आठ ते दहा सातबारे झाले. जमिनीचे तुकडे होत गेले. मोठे वतनदार म्हणून ओळखले गेलेले आजोबांचे नातू अल्पभूधारक शेतकरी झाले. लोकसंख्या वाढीमुळे प्रत्येक गावात, शहरात वाढीव वस्ती झाली. अकृषिक कारणासाठी होत असलेला वापर यामुळे शेती कमी होत गेली. तालुक्यातील आता बहुतांश शेतकऱ्यांकडे एक हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बैल सांभाळणे जिकरीचे झाले. यामुळे ८० ते ८५ टक्के शेतकरी आपली शेती ट्रॅक्टरद्वारे करीत आहेत.
शेती कमी झाली असल्याने बैला विना गोठे रिकामी झाले. आज घडीला परिसरातील पंपावर डिझेल मिळत नसल्याने डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. काही पेट्रोल पंप बंद आहे तर काही पेट्रोल पंपावर वर थोड्या वेळासाठी वाहनांच्या रांगा आणि डिझेल घेऊन जाण्यासाठी डब्याच्या रांगा लागत आहे. पण डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरची भुरभुर कमी झाली. सध्या खरीपाची पेरणीपूर्व मशागतीचे कामे करणे आवश्यक आहे. परंतु डिझेल मिळत नसल्याने ही कामे खोळंबली आहेत. गोठ्यात बैल नाहीत आणि ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेती करणे अवघड झाले आहे. डिझेलचा तुटवडा असाच राहिला तर यावर्षी शेती पडीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असल्याने सध्या शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेती करीत आहे. जर डिझेलच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिली तर पेरणीसह शेतातील तर कामे करणे अवघड झाले आहे. अगोदर विविध योजनेतून सरकार फुकट देण्याचे धोरण अवलंबिले असल्याने शेतीच्या कामाला मजूर मिळणे कठीण झाले. आणि डिझेल अभावी ट्रॅक्टर शेतात नाही आले तर शेतकऱ्यांवर हातात कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ येण्याची शक्यता सर्व सामान्य शेतकऱ्यांतून बोललं जात आहे.


