हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 19/5/2026
NEET पेपरफुटी: २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, पुणे महापालिकेत काँग्रेसचे आंदोलन; मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिकेवर आरोप.
प्रतिनिधी, पुणे
गेल्या १२ वर्षांत ८९ पेपरफुटी, NEET चा पेपर ३ वर्षांत २ वेळा फुटला; नगरसेवक साहिल केदारी यांचा सभा तहकुबीचा प्रस्ताव
पुणे:NEET UG परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून पुणे शहर काँग्रेस आक्रमक झाली आहे. पेपर लीकमुळे देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात जोरदार आंदोलन केले.
*केंद्र सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप*
आंदोलनादरम्यान काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “केंद्राच्या निष्काळजीपणामुळे गेल्या १२ वर्षांत देशात तब्बल ८९ वेळा विविध परीक्षांचे पेपर फुटले आहेत. केवळ NEET UG चाच पेपर गेल्या तीन वर्षांत दोन वेळा लीक झाला,” असा दावा पक्षाने केला. वारंवार पेपर फुटत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण असून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दाही काँग्रेसने उपस्थित केला.
*पुण्यातील मॉडर्न कॉलेजचे नाव आले समोर*
या प्रकरणाला पुणे कनेक्शन असल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर येथील एका प्राध्यापिकेचा थेट सहभाग असल्याचे म्हटले आहे. या संस्थेची मान्यता तातडीने रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. याबत संस्थेची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
*सभा तहकुबीचा प्रस्ताव*
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक ऍडव्होकेट साहिल केदारी यांनी या विषयावर सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. “वैद्यकीय प्रवेशासाठी NEET ही एकमेव राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे. पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारने कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी केदारी यांनी केली.
*प्रकरणाची पार्श्वभूमी*
NEET UG 2024 चा पेपर लीक झाल्याचे प्रकरण मे २०२४ मध्ये उघडकीस आले होते. बिहार, गुजरात, राजस्थानसह पुण्याचे नावही या प्रकरणात समोर आले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास CBI करत आहे. वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ग्रेस मार्क्स मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली होती. मात्र, संपूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.
महापालिका आयुक्तांनी काँग्रेसचे निवेदन स्वीकारले असून ते पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
NEET पेपरफुटी: CBI कडून आतापर्यंत ४० जणांना अटक | NTA च्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली नाराजी


