हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 16/5/2026
आप्पाचीवाडी येथे धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी.
हिंदूसम्राट प्रतिनिधी - उत्तम हेलाटे, आप्पाचीवाडी
आप्पाचीवाडी येथे शाहू मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त मोफत मूत्रपिंड विकार तपासणी, डोळे तपासणी तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली. त्यानंतर किल्ले भुदरगड येथून आणलेल्या पवित्र ज्योतीचे पूजन करण्यात आले. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गाऊन संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून शाहू मंडळाच्या ५१ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी अक्षय रक्तपेढी, मिरज यांच्या टीमने सहकार्य केले. तसेच अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने मोफत मूत्रपिंड विकार तपासणी करण्यात आली असून २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोफत डोळे तपासणी शिबिराचा ७५ नागरिकांनी लाभ घेतला.
समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यकारभारातील मूल्ये जपण्याच्या उद्देशाने मतिवडे येथील देवांश अनाथ आश्रमातील गरजू नागरिकांना मंडळातर्फे नाश्ता व फळांचे वाटप करण्यात आले.
आधुनिकतेला फाटा देत रात्री पारंपरिक मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. देवा आखाडा, अब्दुल लाट यांच्या पथकाने थरारक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाला हजारो ग्रामस्थांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा भव्य कार्यक्रम हालसिद्धनाथ मंदिर परिसरात पार पडला.रात्री धर्मवीर संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला.


