शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 16/5/2026

तलाठ्याच्या एका चुकीने शेतकरी २६ वर्षे परेशान...अखेर जिल्हाधिकारी डॉ.बास्टेवाड यांनीच दिला न्याय

महसूल व्यवस्थेचा गलथान कारभार उघड...  २६ वर्षांनी मिळाला दुरुस्त सातबारा..




विशेष जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड


*लातूर*:दि.१६.प्रशासकीय व्यवस्थेतील हलगर्जीपणा सामान्य नागरिकांचे आयुष्य कसे अडकवू शकतो, याचे जिवंत उदाहरण लातूरमध्ये समोर आले आहे. 


तब्बल २६ वर्षांपूर्वी महसूल विभागातील एका चुकीच्या नोंदीमुळे ८५ वर्षीय वृद्ध शेतकरी प्रभाकर विनायकराव प्रयाग यांना अनेक वर्षे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले.मात्र,जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत अवघ्या दोन दिवसांत प्रश्न निकाली काढल्याने प्रशासनाचा संवेदनशील आणि जबाबदार चेहराही समोर आला आहे.


लातूर तालुक्यातील खोपेगाव शिवारातील प्रभाकर प्रयाग यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर २६ वर्षांपूर्वी चुकीची नोंद करण्यात आली होती.वासनगाव तलावाच्या कालव्यासाठी जमीन संपादित करताना प्रत्यक्षात कालवा त्यांच्या भावाच्या शेतातून गेला होता. मात्र, तत्कालीन तलाठ्याच्या निष्काळजीपणामुळे श्री. प्रयाग यांच्या सातबाऱ्यावरही ‘६ आर जमीन संपादित’ झाल्याची नोंद झाली. ही चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे महसूल विभागाकडे पाठपुरावा केला,पण प्रत्येक वेळी तांत्रिक कारणे आणि कागदी प्रक्रियांच्या नावाखाली त्यांना प्रतीक्षा करावी लागली.


एका चुकीच्या नोंदीने वृद्ध शेतकऱ्याचे आयुष्यभराचे मानसिक हाल झाले. वयाच्या ८५ व्या वर्षीही न्यायासाठी शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.


दरम्यान,हे प्रकरण जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने फाईल मागवून घेतली. संबंधित विभागाला स्पष्ट सूचना देत दुरुस्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.त्यानंतर महसूल प्रशासनाने जलद हालचाली करत अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्रुटीमुक्त सातबारा तयार करण्यात आला.


गुरुवार,१४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभाकर प्रयाग यांच्या हाती दुरुस्त सातबारा सुपूर्द करण्यात आला.२६ वर्षांचा लढा संपल्यानंतर वृद्ध शेतकरी भावूक झाले. “जर प्रशासनाने आधीच लक्ष दिले असते,तर एवढी वर्षे त्रास सहन करावा लागला नसता,” अशी भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होती.


या घटनेमुळे महसूल विभागातील दिरंगाई,चुकीच्या नोंदी आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.


 त्याचवेळी संवेदनशील अधिकारी इच्छाशक्ती दाखवतील,तर अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नही काही दिवसांत मार्गी लागू शकतात,हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top