शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 16/5/2026

परेश ठाकूर केसरी २०२६ : कामोठ्यात सोमवारी कुस्तीचा महासंग्राम, देशभरातील दिग्गज मल्लांच्या लढतीने रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’.


हिंदुसम्राट उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यासंकडून )


भाजपचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी कामोठे सेक्टर ०६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर आयोजित केल्याने कामोठ्यात ‘मिनी महाराष्ट्र केसरी’चा थरार अनुभवायला मिळणार आहे. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक दिनेश खानावकर, सुमित झुंझारराव, आयोजक नगरसेवक हॅप्पी सिंग, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, कुस्ती प्रशिक्षक रुपेश पावशे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार महेश लांडगे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नविन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पश्चिम मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.  


परेश ठाकूर यांनी सांगितले की, वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून प्रेरणा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पनवेलमधील नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती सामने प्रत्यक्ष पाहता यावेत, महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सातत्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. दरवर्षी हजारो क्रीडाप्रेमी या स्पर्धेला उपस्थित राहून मातीतील थरार अनुभवतात. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी तसेच महिला कुस्तीपटूंचे विशेष सामने हे यंदाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. एकूण विजेत्यांसाठी १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै. लाली चमकोर, उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुद्ध पंजाबचा पै. बागा सिंघ, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पै. संदीप कुमार, महाराष्ट्र केसरी पै. दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. माउली कोकाटे यांच्या लढती होणार आहेत. महिला गटात पै. अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पै. एकता शर्मा, राष्ट्रीय पदक विजेती पै. पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. वेदांतीका पवार आणि नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पै. रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची पै. कोमल यांच्यात सामने रंगणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मल्लांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण ७५ सामने होणार आहेत. स्थानिक मल्लांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. दर्जेदार मैदान, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय सुविधा व इतर सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याचे परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.  


परेश ठाकूर यांनी पनवेल व रायगड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. युवकांना सक्षम व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी मिळावी आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी विविध उपक्रमांना कायम प्रोत्साहन दिले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेत असताना सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि माणुसकीची जपणूक हा त्यांचा पिंड आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास आणि संस्कारांची परंपरा जपणे ही त्यांची भूमिका अनेक उपक्रमांतून दिसून येते. कुस्ती हा केवळ खेळ नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे, ही भावना जपत परेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती खेळाला भक्कम पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागातील अनेक नवोदित मल्लांना आर्थिक, सामाजिक व नैतिक आधार देत त्यांच्यातील गुणवत्ता राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कुस्तीसह क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, बॉडीबिल्डिंग यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांविषयीही त्यांना विशेष आत्मीयता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या दर्जेदार व भव्य स्वरूपातील कुस्ती सामन्यांचा कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक नगरसेवक हॅप्पी सिंग आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top